दूध आणि खाद्यपदार्थांत भेसळ केल्यास दंड, आजन्म कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 03:13 AM2018-11-23T03:13:36+5:302018-11-23T03:14:11+5:30
खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अपायकारक होणारी भेसळ केल्यास संबंधितास आजन्म कारावास व दंड या दुरुस्तीचे विधेयक विधानसभेत गुरुवारी गदारोळातच मंजूर करण्यात आले.
मुंबई : खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अपायकारक होणारी भेसळ केल्यास संबंधितास आजन्म कारावास व दंड या दुरुस्तीचे विधेयक विधानसभेत गुरुवारी गदारोळातच मंजूर करण्यात आले. फौजदारी कायद्याच्या १९७३ मधील पाच कलमांमध्ये त्यासाठी दुरुस्ती करण्यात आली आहे. असे करणारे महाराष्टÑ चौथे राज्य आहे.
या दुरुस्तीमुळे भेसळ करणाऱ्याांवर वचक निर्माण होईल व गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र होतील. दुधामध्ये भेसळीची प्रकरणे समोर आली होती. भेसळयुक्त वा असुरक्षित अन्न वा बनावट औषधी द्रव्यांसंबधी ज्या गुन्ह्यांचा तपास लागला, त्यातील आरोपींना अटक करणे वा स्थानबद्ध करण्याची गरज असते. मात्र सध्या हे गुन्हे बिनदखली व जामीनपात्र असल्याने पोलीस, अन्न सुरक्षा अधिकारी व एफडीएच्या अधिकाºयांना गुन्ह्याच्या तपासात अडचणी येत होत्या.
दुधातील पाण्याची भेसळ ही निकृष्ट दर्जात मोडते. त्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा नाही. त्यासाठी मूळ कायद्यानुसार शिक्षा होईल, असे बापट म्हणाले. नव्या दुरुस्तीनुसार दंड किती असेल हे स्पष्ट नाही असे, विचारता बापट म्हणाले, दंडाची रक्कम नियम करताना स्पष्ट केले जाईल.
कठोर कायदा गरजेचा
राज्यात १ एप्रिल २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत एकूण ६०४ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले होते. त्यापैकी ३०२ प्राप्त अहवालामध्ये २१९ नमुने प्रमाणित घोषित झाले.
तर ८३ नमुने कमी दर्जाचे होते. कमी दर्जाच्या नमुन्यांसंदर्भात कारवाई करण्यात येत असली तरी यासाठी कठोर कायद्याची गरज होती, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी सांगितले.