आयुष्य घडवणारे 'दूध'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 01:30 AM2017-01-22T01:30:49+5:302017-01-22T01:30:49+5:30

माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर पहिल्यांदा पाजलं जातं ते 'दूध'. म्हणूनच आयुष्यात सर्वगुणसंंपन्न असलेल्या दुधाचे महत्त्व कितीतरी मोठे आहे.

'Milk' making life | आयुष्य घडवणारे 'दूध'

आयुष्य घडवणारे 'दूध'

googlenewsNext

- भक्ती सोमण

माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर पहिल्यांदा पाजलं जातं ते 'दूध'. म्हणूनच आयुष्यात सर्वगुणसंंपन्न असलेल्या दुधाचे महत्त्व कितीतरी मोठे आहे.

जनजागृती महत्त्वाची
मुलाच्या जन्मानंतर आईला भरपूर दूध येतं. जास्तीच दूध काही जणी फेकून तरी देतात किंवा जपून ठेवतात, पण ज्यांना दूधच येत नाही, त्यांची मुले पावडरच्या दुधावर अवलंबून असतात. खरे तर त्यांनाही आईचं दूध मिळणं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. यासाठी मानवी दुग्धपेढी मोलाची भूमिका बजावत आहेत.

सध्या मुंबईत सायन आणि वाडीया रुग्णालयात अशा मानवी दुग्धपेढी आहेत. तिथे ज्यांना जास्त दूध येत असेल, त्या महिला आपलं दूध देऊ शकतात. याविषयी सायन हॉस्पिटल येथील नवजात शिशु विभाग आणि मानवी दुग्धपेढीच्या प्रमुख डॉ. जयश्री मोंडकर म्हणाल्या, ‘जर आईला दूध आले नाही, तर आमच्याकडे असणाऱ्या दुग्धपेढीचेच दूध आम्ही देतो. ज्या आयांना दूध जास्त येतं, त्यांनी ते दान करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेवढं दूध तुम्ही बाळाला पाजता, तेवढंच दूध तुम्ही परत तयार करता. त्यामुळे दूध दान केल्यावर आपलं दूध कमी होईल हा गैरसमज दूर झाला पाहिजे. उलट तुम्ही केलेल्या दानामुळे अनेक मुलांचे आयुष्य घडण्यासाठी फायदा होणार असतो. आपल्या समाजातही याबाबत मोठी जनजागृती होणे गरजेचे आहे.’

आपल्याला जगण्यासाठी ज्याप्रमाणे पाणी आवश्यक आहे, त्याप्रमाणेच आयुष्य घडवण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे 'दूध' पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे ही दूधातून मिळतात.
जन्माला आल्याबरोबर पहिल्यांदा आपला दुधाशी परिचय होतो. जन्मल्यावर काही वेळातच बाळाला भूक लागते, अशा वेळी त्याला आईचे दूध दिले जाते. एवढा छोटासा जीव, पण ते खूप प्रयत्न करून कसे दूध प्यायचे ते शिकतेच आणि आईलाही तेव्हा कृतकृत्याची भावना असते. नऊ महिन्यांच्या काळात आई मनाने बाळाच्या जवळ असते, पण तो पहिला दूध पिण्याचा क्षण मात्र, तिच्यासाठी आनंदाचा ठेवाच असतो. असे हे आईचे दूध जगण्यासाठी कितीतरी मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावते. आजकाल तर डॉक्टर बाळ जन्मल्यानंतर आईला येणारे पहिले चिकाचे दूध त्याला दिलेच पाहिजे, असा आग्रह धरतात.
आईच्या दुधानंतर मोठे झाल्यावर आपण म्हशीचं, गायीचं दूध प्यायला लागतो. त्यामुळे हे दूध देणाऱ्या या जिवांचेही आपल्यावर मोठे उपकारच आहेत. मात्र, हे दूध पाश्चराइज करून आपल्यापर्यंत पोहोचतं. या दुधाचा दिवसभर भरपूर वापर आपण करतो. आता दुधाविना चहा, कॉफी पिण्याचे फॅड वाढले असले, तरी दुधाशिवाय चहा, कॉफी पिण्याची मजा काही औरच असते, असे मानणारेही भरपूर लोक आहेत. याशिवाय रोजच्या आहारात लागणारे दही, ताक, क्रीम ते अगदी तूपही तयार होण्यात दुधाचा हातभार मोठा आहे. जर दूध नासले, तर त्यापासून पनीर, चक्का हे पदार्थही तयार होतात. खिरीसाठी तर दूध अपरिहार्यच.
हिवाळ््यात भरपूर फळे येतात. त्यातल्या विशिष्ट फळांमध्ये दूध घालून केलेले मिल्कशेक्स, स्मूदी सध्या खूप लोकप्रिय आहेत. या प्रकारांमध्ये चव येण्यासाठी विविध घटक जरी वापरले जात असले, तरी त्यांना एकसंध करण्याचं काम दूधच करतं. त्यामुळे एकदा प्यायल्यावर ते पुन्हा-पुन्हा प्यावं असं वाटत असतं. माणसांच्या बरोबरीनेच मांजर, कुत्र्यासारखे काही प्राणीही दूध आवडीने पितात, हे आपण पाहत असतो.
दूध आपल्या आयुष्यात इतकी महत्त्वाची भूमिका बजावत असताना, अनेक लोक दुधात
भेसळ करताना दिसतात. अनेक ठिकाणी तर त्यात भरपूर पाणी घालून विकले जाते. असे कितीतरी प्रकार आपल्या आजूबाजूला होत असताना त्याकडे डोळेझाक करून चालणार नाहीच. त्यासाठी आता समाजानेही पावले उचलण्याची गरज आहे. कारण जे आयुष्य घडवण्यासाठी उपयोगी असते, त्याचा आदर हा केला जावाच. यासाठीच सर्वांनी प्रयत्न करू या.

Web Title: 'Milk' making life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.