नागपुरात मायेच्या दुधाची बँक
By Admin | Published: March 6, 2017 11:25 PM2017-03-06T23:25:41+5:302017-03-06T23:25:41+5:30
माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात
सुमेध वाघमारे
नागपूर, दि. 6 : माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. नवजात अर्भक अमृतासमान असलेले आईच्या दुधापासून वंचित राहतात, तर काही कारणांमध्ये आई अंगावर बाळाला पाजू शकत नाही. अशांना वरचे दूध द्यावे लागते. पण या वरच्या दुधात आवश्यक ती संरक्षक द्रव्ये राहात नाही. यामुळे मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ मंदावते़ यावर उपाय म्हणून इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेयो) मानवी दुग्ध पेढी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा आईच्या दुधापासून परके झालेल्या नवजात शिशूंना मिळणार आहे.
विशेष म्हणजे, अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने निर्दयी माता निष्पाप जीवाला उकिरड्यावर सोडून पळ काढतात़ अशा निराधार मुलांची रवानगी मग अनाथालयात होते. अशा चिमुकल्यांचे योग्यरीत्या पपोषण होण्यासाठी मानवी दुग्ध पेढीह्णची मागणी गेल्या काही वर्षांपासून अनाथालयाकडून वाढली होती.
आईच्या दुधाला वंचित राहिलेल्या बाळाला वरचे दूध म्हणून गाई-म्हशीचे दूध नाही तर पावडरचे दूध दिले जाते. मात्र आईच्या दुधात असणारी संरक्षक द्रव्ये या दुधात नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्येही अत्यंत अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांना जंतूसंसर्ग होतो. बाळ वारंवार आजारी पडतात. अशा बाळांसाठी १९८९ साली डॉ. अल्मिडा यांनी आशिया खंडातील पहिली मातृ दुग्ध पेढी स्थापन केली. यात माता आपल्याकडचं जास्तीचे दूध दान करते.
-अशी राहणार मिल्क बँक
बाळंतपणानंतर काही वेळेस आईच्या शरीरात बाळाच्या गरजेपक्षा जास्त दूध तयार होते. अशा वेळेस ते दूध फेकून न देता त्यांना दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या दुधाचा उपयोग अपुऱ्या दिवसांच्या बाळांसाठी किंवा अतिदक्षता विभागात ठेवलेल्या बाळासाठी होतो. शिवाय ज्या स्त्रियांना बाळंतपणानंतर बाळाला पाजण्यासाठी अजिबातच दूध येत नाही त्यांना किंवा आईने सोडून दिलेल्या बाळासाठी मातृ दुग्ध पेढीतील दुधाचा उपयोग होऊ शकतो.
-पेढीतील दूध बाळाच्या आरोग्यासाठी सुरक्षित
आईच्या दुधाएवढेच हे दूध सुरक्षित असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यांच्या मते, बाळंतपणानंतर निरोगी प्रकृती असणाऱ्या स्त्रीचे दूध साठवून ठेवले जाते. दूध हे शास्त्रोक्त पद्धतीने साठवले जाते. ब्रेस्ट पंपाच्या मदतीने स्टील कंटेनरमध्ये सर्वात आधी थोडे म्हणजे साधारण पाच मिलीलिटर दूध काढून घेतले जाते. मग हे दूध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाते. प्रयोगशाळेतून दुधाची शुद्धता तपासल्यावर आईकडून जास्त दूध घेतले जाते. दुधाचे कल्चर केले जाते. या प्रक्रि येमुळे दूध स्तनपानाच्या दुधाइतकेच चांगले आणि पौष्टिक राहते.
-मातृ दुग्ध पेढीचा पर्याय योग्य
आईचे दूध उपलब्ध होऊ न शकणाऱ्या बाळांसाठी मातृ दुग्ध पेढीचा पर्याय योग्य आहे. बाळाला पहिले चीक दूध पाजलेच पाहिजे; पण कधी कधी दुर्दैवाने आईचे दूध बाळाला देता येत नाही. तेव्हा पर्याय उरतो तो या पेढीचा. सायन हॉस्पिटलनंतर आता कामा, केईएम, जे.जे. हॉस्पिटल व आता अमरावतीच्या शासकीय रुग्णालयामध्येही या पेढीला सुरु वात झाली आहे. मेयोत ही पेढी सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) व इंडियन अकॅडमी आॅफ पिडियाट्रिक्स यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात रोटरी क्लबचीही मदत घेतली जाणार आहे.
-डॉ. दीप्ती जैन
विभागप्रमुख, बालरोग विभाग, मेयो