दूध दराला फुटणार उकळी
By admin | Published: May 18, 2015 04:39 AM2015-05-18T04:39:03+5:302015-05-18T04:39:03+5:30
: मुंबईकरांना दूध पुरवठा करणाऱ्या काही नामांकित कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या किंमतीत लीटरमागे दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे
मुंबई : मुंबईकरांना दूध पुरवठा करणाऱ्या काही नामांकित कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या किंमतीत लीटरमागे दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. दूध विक्रेत्यांनी कमिशनवाढीची मागणी केल्याने दरवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याआधी कमिशनवाढ करण्यास नकार देणाऱ्या दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला होता. त्यानंतर विक्रेत्यांनी गोकुळ, महानंद, मदर डेअरी, वारणा आणि अमुलच्या दूध विक्रीवर बहिष्कारही टाकला होता. मात्र बहिष्कारानंतर झालेल्या चर्चेत महानंदने लीटरमागे २ रुपये व गोकुळने १ रुपयाच्या दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे विक्रेत्यांच्या कमिशनमध्येही वाढ झाली. मात्र वारणा, अमुल आणि मदर डेअरी कंपन्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केली नसल्याने मंगळवारपासून त्यांच्या दूध विक्रीवर बहिष्कार टाकणार असल्याचे अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाचे जगदीश कट्टीमणी यांनी सांगितले.
कट्टीमणी म्हणाले, महानंदने कमिशनवाढ केली असून गोकुळने तशी घोषणा केली आहे. मात्र अन्य तीन कंपन्यांकडून अद्याप ठोस आश्वासन मिळालेले नाही. ३६५ दिवस ग्राहकांची सेवा करणाऱ्या विक्रेत्यांची कोणत्याही कंपनीच्या दफ्तरी नोंद नाही. तुटपूंज्या कमिशनवर काम करणे परवडत नसल्याने विक्रेते एमआरपीहून अधिक किंमतीने दूध विक्री करत होते. ग्राहकही कोणतीही तक्रार न करता अधिक पैसे देत होते. मात्र वैध मापन शास्त्र विभागाने सुरू केलेल्या कारवाईने विक्रेत्यांना आता अधिकृतपणे कमिशन हवे आहे. त्यासाठी कंपन्यांकडेही ठराविक टक्के कमिशनची मागणी केली.त्यातल्या त्यात महानंद आणि गोकुळने प्रतिसाद दिल्याने त्यांच्यावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अमुल, वारणा आणि मदर डेअरी च्या दुधाची विक्री बंद करण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)