दुधाचे दर वाढले!
By admin | Published: July 6, 2016 01:21 AM2016-07-06T01:21:21+5:302016-07-06T01:21:21+5:30
दर वाढीमुळे शेतक-यांना अल्पसा दिलासा मिळाला असून शासकीय डेअरीतील दूध संकलनात वाढ होणार आहे.
अकोला: शासनाने गाय व म्हशीच्या दुधाचे दर वाढवल्याने राज्यातील शासकीय दूध योजनकडील दूध संकलनास मदत होणार असून, पशुपालक शेतकर्यांचा लाभ होणार आहे; परंतु ही वाढवलेली दुधाची रक्कम तोकडी असल्याने पशुखाद्याचे बाजारातील दर बघून यात वाढ अपेक्षित असल्याचा सूर शेतकर्यांमध्ये आहे.
पशुपालक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने १ जुलैपासून दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. गायीचे दूध सध्या २0 रुपये लीटर आहे. यामध्ये २ रुपये वाढ केली आहे म्हणजे आता गायीचे दूध घेण्यासाठी ग्राहकांना २ रुपये अधिक द्यावे लागतील; परंतु गायीच्या या दुधातील फॅटचे प्रमाण हे ३.५ तर मलई विरहित गुणप्रत (एसएनएफ) ही ८.५ प्रमाणे असणे गरजेचे आहे. म्हशीच्या दुधातही प्रतिलीटर २ रुपये वृद्धी झाली आहे. या दुधातही फॅटचे प्रमाण ६.0 तर मलई विरहित गुणप्रत ही ९.0 (एसएनएफ) असणे अनिवार्य आहे.
राज्यातील शेतकर्यांनी शेतीला पूरक पशुपालनाचा जोडधंदा करण्यासाठी शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी काही योजना सुरू करण्यात आल्या असून, शेतकर्यांना शेळ्य़ा, मेढय़ा वाटपासह, गायी, म्हशींचे या अगोदर वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, दुधाचे दर वाढल्याने शासकीय दूध योजना व दूध उत्पादकांच्या संघाच्या महासंघाकडे दुधाचे संकलन वाढून अनेकांना रोजगार उपलब्घ होणार आहे. अकोला येथे राज्यातील सर्वात जुनी शासकीय दूध योजना आहे; परंतु या भागात पाहिजे त्या प्रमाणात दुग्धोत्पादनाचा व्यवसाय वाढला नाही. जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचा महासंघामार्फत दूध संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकर्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जाते आहे; परंतु चारा व पाण्याचा अनेक वेळा प्रश्न निर्माण होत असल्याने दुग्धोत्पादनावर त्याचे परिणाम झाल्याचे दिसून येते.
सध्या पश्चिम विदर्भातील दूध संकलन घटले आहे. परिणमी अकोला येथील शासकीय दूध योजनेला दूध पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे परभणी व वर्धा येथून दूध आणून शहराला दुधाचा पुरवठा केला जात आहे.