दूध उत्पादक मेटाकुटीला

By Admin | Published: August 26, 2016 01:08 AM2016-08-26T01:08:10+5:302016-08-26T01:08:10+5:30

खासगी व्यावसायिकांचे वाढलेले प्राबल्य यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यांतील सर्वसामान्य दूधउत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Milk producer Metakutila | दूध उत्पादक मेटाकुटीला

दूध उत्पादक मेटाकुटीला

googlenewsNext


बारामती : पावसाने दिलेली ओढ, चाऱ्याचे गगनाला भिडलेले दर, दराबाबत शासनस्तरवरील उदासीनता, खासगी व्यावसायिकांचे वाढलेले प्राबल्य यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यांतील सर्वसामान्य दूधउत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या कात्रज संघ वगळता दुधाला २१ रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता मिळणारा दर कमी असल्याने शेतकऱ्यांचे गोठे रिकामे होऊ लागले आहेत.
बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या जिरायती पट्ट्यात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. इंदापूर तालुक्यात सर्रासपणे खासगी दूध संंकलन कंपन्यांचे प्राबल्य वाढले आहे. येथील इंदापूर तालुका दूध संघ मागील दीड वर्षापूर्वी बंद पडला. तर तालुक्याच्या पश्चिम भागातील केवळ १२ हजार लिटरच्या आसपासच दूध कात्रज दूध संघाला जात आहे. कात्रज दूध संघ सध्या दुधाला २३ रुपये ७० पैसे दर देत आहे. तर त्यावर एक रुपया बोनसही दिला जात आहे. त्यामुळे कात्रज दूध संघाकडे जाणाऱ्या दुधाला सुमारे २४ रुपये ७० पैसे दर मिळत आहे. मात्र इंदापूर तालुक्यात दररोज लाखो लिटर दूध उत्पादन होत आहे. या उर्वरित दुधावरची मलई मात्र खासगी दूधसंकलन कंपन्या खात आहेत. त्यात या कंपन्यांनी स्वत:चे पशुखाद्यही बाजारात आणले आहे. सध्या पशुखाद्याची ५० किलोची पिशवी ८९० रुपयांना मिळते. ज्या शेतकऱ्यांचे दूध घ्यायचे त्या शेतकऱ्यालाच अवाच्या सवा किमतीत पशुखाद्य विकायचे. तसेच दुधाला दरही कमी द्यायचा. त्यामुळे खासगी दूधसंकलन कंपन्यांना दूध घालणाऱ्या दूधउत्पादक शेतकऱ्याचे दुहेरी आर्थिक शोषण करण्याचा प्रकार इंदापूर तालुक्यात सुरू आहे. या कंपन्यांवर शासनस्तरावरून कसलेही नियंत्रण नाही. परिणामी या कंपन्यांची पाळेमुळे विस्तारू लागली आहेत. मागीलवर्षी दूध पावडरचे दर पडल्याची ओरड देऊन खासदी दूध संकलन कंपन्यांनी दुधाचे दर १५ रुपयांपर्यंत नीचांकी पातळीवर आणले. प्रत्यक्षात दुधापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांची विक्री हेच खासगी दूध कंपन्या चढ्या दराने करीत आहेत. मात्र सर्वसामान्य दूध उत्पादकाच्या दुधाला दर देण्याची वेळ येते तेव्हा मात्र दूध पावडरचे कारण पुढे केले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: Milk producer Metakutila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.