राज्याकडून मलमपट्टी, केंद्राकडून जखमेवर मीठ; दूध उत्पादक शेतकरी हवालदिल 

By राजाराम लोंढे | Published: June 29, 2024 01:30 PM2024-06-29T13:30:22+5:302024-06-29T13:30:54+5:30

राजाराम लोंढे कोल्हापूर : पाण्यापेक्षा गाय दुधाचे भाव कमी झाल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला सावरण्यासाठी ...

Milk producing farmers of the state are worried due to the decrease in the price of cow milk | राज्याकडून मलमपट्टी, केंद्राकडून जखमेवर मीठ; दूध उत्पादक शेतकरी हवालदिल 

राज्याकडून मलमपट्टी, केंद्राकडून जखमेवर मीठ; दूध उत्पादक शेतकरी हवालदिल 

राजाराम लोंढे

कोल्हापूर : पाण्यापेक्षा गाय दुधाचे भाव कमी झाल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला सावरण्यासाठी एकीकडे राज्य सरकारनेदूध अनुदान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असताना, केंद्र सरकारने मात्र, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला आहे. दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्याने दूध पावडरची देशातंर्गत बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे.

डिसेंबर २०२३ पासून गाय दुधाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूध पावडरला दर नसल्याने अतिरिक्त दुधाचे करायचे काय? असा प्रश्न आहे. राज्य सरकारने जानेवारीमध्ये दोन महिने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले. मार्चनंतर दूध कमी होऊन सगळीकडेच दुधाची मागणी वाढेल आणि पावडरला चांगले भाव मिळतील, अशी दूध संघांची अपेक्षा होती. मात्र, उन्हाळ्यात दूध कमी झाले नसल्याने पावडरमधील घसरण सुरूच राहिली. 

गेली सात महिने ‘गोकुळ’, ‘वारणा’ व ‘राजारामबापू’ वगळता राज्यातील दूध संघांनी मनमानी पद्धतीने गाय दुधाची खरेदी केली आहे. खासगी दूध संघांकडून २२ ते २६ रुपये लिटरने खरेदी सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातून राज्य सरकारने गाय दुधाला बंद केलेले अनुदान पूर्ववत करण्याची मागणी झाली, त्यातून राज्याच्या अर्थसंकल्पात प्रतिलिटर पाच रुपये अनुदान १ मे २०२४ पासून देण्याचा निर्णय जाहीर केला. 

तत्पूर्वीच केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून १० हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. अगोदरच दूध संघांची गोडावून पावडरने भरली असताना, दहा हजार टनची भर त्यात पडणार आहे. परिणामी देशांतर्गत बाजारपेठेतील पावडरच्या दरात आणखी घसरण होऊन दुधाचे दर आणखी कमी होण्याचा धोका आहे.

अनुदानाचा २५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ

राज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी घातलेल्या अटी पाहता काेल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील ७५ टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित राहतात. ‘गोकुळ’ने कोल्हापुरात नियोजनबद्ध यंत्रणा राबवून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना अनुदान कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले.

राज्यात ‘गोकुळ’, ‘वारणा’च आघाडीवर

गाय दूध खरेदी दर पाहिले, तर राज्यात ‘गोकुळ’, ’वारणा’ व ‘राजारामबापू’ हेच संघ आघाडीवर आहेत. तिन्ही संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी ३३ रुपये दर देतात.

तुलनात्मक गाय पावडरचे दर प्रतिकिलो

पावडर/बटर - जून २०२३ - जून २०२४

पावडर  - २९० ते ३०० - २०० ते २१०
बटर  - ३९० ते ४२०  - ३३० ते ३५०

Web Title: Milk producing farmers of the state are worried due to the decrease in the price of cow milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.