दूधगंगा संघ पुन्हा बंद पडले
By admin | Published: April 8, 2017 01:37 AM2017-04-08T01:37:59+5:302017-04-08T01:37:59+5:30
कामगारांचा तीन महिन्यांचा पगार रखडला असल्याने कामगारांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली
इंदापूर : दूधगंगा दूध उत्पादक संघ पुन्हा बंद पडला आहे. कामगारांचा तीन महिन्यांचा पगार रखडला असल्याने कामगारांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. शासनाने दूधगंगा दूध संघावर प्रशासक नेमावा अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.
राज्य शासनाने दि. २४ आॅगस्ट २०१६ रोजीच्या आदेशाने दूधगंगा दूध संघ अवसायानात काढला आहे. त्या आदेशाच्या विरोधात संचालक मंडळाने अपील केले आहे. त्याची सुनावणी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासमोर दि. २६ सप्टेंबर २०१६ रोजी पार पडली. त्यावरील अंतिम निर्णय प्रलंबित आहे. दरम्यान एका खासगी व्यक्तीला दूध संघ चालविण्यास दिला. केवळ तीन महिन्यांचे पगार वेळेवर झाले. पंचायत समितीच्या निवडणूक निकालाच्या दिवशीच दूध संघ बंद केला. संघ बंद झाल्याने, या निवडणुका व कामगारांची मते डोळ्यांसमोर ठेवून काही काळापुरता दूध संघ चालू ठेवण्यात आला. संचालक मंडळाला संघ व्यवस्थित चालवता येत नसेल तर शासनाच्या आदेशाला अपील करुन संघ ताब्यात ठेवण्याचा अट्टहास कशासाठी, अशी विचारणाही कामगारांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश म्हेत्रे, उपाध्यक्ष गणपतराव पवार म्हणाले, की सध्या संघाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. महावितरणची वीजबिलाची थकबाकी पाच लाख रुपये झाली आहे. दोन महिन्यापासून वीजपुरवठा बंद आहे. इंदापूर नगरपालिकेची मिळकतकराची रक्कम ६ लाख ८५ हजार थकवली आहे. कामगारांच्या तीन महिन्यांचे पगार झाले नाहीत. भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्यात आली नाही.
या संदर्भात दूधगंगा संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले, की दूधगंगा संघ पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संघ बंद नाही. आर्थिक स्थिती बिकट असली तरी मार्ग काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. कामगारांचे पगार थकले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आर्थिक मंदीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारही महिनोनमहिने होत नाहीत. दूधगंगाच्या कामगारांचेही पगार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.