पूरपरिस्थितीमुळे स्वातंत्र्य दिनासह रक्षाबंधनावर दूधटंचाईचे सावट; बासुंदी, श्रीखंड, मिठाईची टंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:40 AM2019-08-14T05:40:39+5:302019-08-14T05:41:25+5:30
कोल्हापूर, सांगली व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका दूध संकलनावर झाला आहे.
ठाणे : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दुधालासुद्धा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. आजघडीला ठाण्यात ८ लाख लीटर दूध येते. मात्र, कोल्हापूर, सांगली व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका दूध संकलनावर झाला आहे.
ठाणे परिसरात येणारे जवळपास ५५ टक्के लीटर दूध कमी झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवस ठाणे, मुंबई, पनवेल या परिसरात दूधटंचाई भासणार असल्याचेही दूध संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशीही दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या बासुंदी, श्रीखंडासह मिठाई सारख्या तत्सम पदार्थांची आवकही कमी होण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरासह मुंबई, पनवेल आदी भागात रोज सुमारे ४५ लाख लीटर दूध येते. परंतु, कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थितीचा दूध विक्रीवरही परिणाम झाला असून या भागातील दुधाची आवक ५५ टक्यांनी कमी झाली आहे. कोल्हापूर, सांगली या भागातील पूर ओसरला असला तरी अद्यापही दूध विक्री करणाºया कंपन्यांकडून दुधाची आवक वाढलेली नाही. त्यामुळे आजही मुंबई, पनवेल आणि ठाण्यात दुधाची टंचाई निर्माण झाल्याचे दिसत आहे.
केवळ हा परिणाम दुधावरच झाला नसून दुधापासून तयार करण्यात येणाºया बासुंदी, श्रीखंड, मावा, चक्का, दही आदींवरही झाल्याचे दिसून येत आहे. त्यांचीही आवाक कमी झाल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. म्हशीच्या दुधापासून अनेक पदार्थ तयार होत असतात. परंतु,त्याच दुधाचा तुटवडा अधिक निर्माण झाल्याने मीठाईवाल्यांपुढेही काहीसे संकट उभे ठाकले आहे. आता एक दिवसावर रक्षाबंधन आणि स्वतंत्रता दिवस आला आहे. त्यावेळेस मिठाईची मागणी वाढणार आहे. परंतु, त्या प्रमाणात पुरवठा करणे काहीसे शक्य होणार नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
दरम्यान दूधपुरवठा करणाºया वारणा, गोकूळ, कृष्णा व इतर दूध कंपन्यांमध्ये पुरेसे दूध आलेले नाही. या सर्वांचा फटका वितरणावर होत असल्याची माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.
मुंबई, ठाण्यात येते ५० लाख लीटर दूध
मुंबई, ठाणे, पनवेल, या ठिकाणी एकूण ४५ ते ५० लाख लीटर दूध येते. गोकुळचे दूध ठाण्यात २ लाख लीटर येते, तर अमुलचे दूध अडीच लाख लीटर, वारणाचे १ ते दीड लाख लीटर, महानंदाचे १ लाख लीटर, मदर डेरीचे २० हजार लीटर येते, तसेच सर्वसाधारण दुधामध्ये विकास दूध २० हजार लीटर, हेरी डेज ५ हजार लीटर, पतंजली ५ हजार, गोवर्धन १० हजार लीटर इतके दूध येत असते.
परंतु ठाणेकरांना गोकुळ, अमूल, कृष्णा या कंपनीच्या दुधाचा पुरवठा गेल्या पाच दिवसांपासून झालेला नसल्याची बाब समोर आली आहे. वारणा काही प्रमाणात आणि इतर दूध कंपन्यांकडूनही काही प्रमाणात ते येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस असाच काहीसा प्रकार असणार असल्याचे बोलले जात आहे. तर येत्या रक्षाबंधनसारख्या सणासुदीत जर दूध उपलब्ध झाले नाही, तर मोठे परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतील, असे दूध व्यावसायिक सांगतात.
कोल्हापूर आणि सांगली भागात झालेल्या पावसाचा फटका दुधालाही बसला आहे. दुधाची आवक मुंबई, पनवेल आणि ठाणे भागात ५५ टक्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे येत्या सणाच्या दिवसात याचे परिणाम आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
- पांडुरंंग चोढणेकर आणि अमरजीत दळवी, सहसचिव, ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्था