शेतकरी संप : झेड सुरक्षेत मुंबईत आणले दुधाचे टँकर्स

By admin | Published: June 6, 2017 11:56 AM2017-06-06T11:56:55+5:302017-06-06T12:05:06+5:30

संपकरी शेतकऱ्यांनी सोमवारी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील शेतक-यांनी पुकारलेल्या संपाची झळ आता शेजारील राज्यांनाही सोसावी लागत असल्याचे दिसत आहे.

Milk tankers brought to Z | शेतकरी संप : झेड सुरक्षेत मुंबईत आणले दुधाचे टँकर्स

शेतकरी संप : झेड सुरक्षेत मुंबईत आणले दुधाचे टँकर्स

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - संपकरी शेतकऱ्यांनी सोमवारी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील शेतक-यांनी पुकारलेल्या संपाची झळ आता शेजारील राज्यांनाही सोसावी लागत असल्याचे दिसत आहे. शेतक-यांच्या संपामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून त्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. 
अहमदाबादमध्ये भाजीपाल्यांच्या किंमत गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दुप्पट झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी दुधाचे 27 टँकर्सं झेड श्रेणी सुरक्षेत मुंबईत आणण्यात आले. 
 
दुधाचे हे 27 टँकर्स मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या मार्गानं कडेकोड बंदोबस्त मुंबईत आणण्यात आले.  मिळालेल्या माहितीनुसार, हे टँकर्स कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आहे.
शिमला मिरची, टोमॅटो, कारले, हिरव्या मिरच्या, आले. कोबी या भाज्या साधारणतः महाराष्ट्रातच पिकवल्या जातात, मात्र शेतकरी संपामुळे बाजारपेठांमध्ये भाजीपाल्यांची आवक घटली आहे. 
 
१ जूनपासून संपावर असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले अल्पभूधारकांच्या कर्जमाफीसह इतर निर्णय अमान्य करत ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला राज्यातील शेतकरी, शेतमजूर, अडते, व्यापारी व दूध संकलकांनी चांगला प्रतिसाद दिला. संपाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता. हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे.
(मुंबईमध्ये भाज्यांचे दर कडाडले)
शेतकरी संपामुळे  मुंबई, नवी मुंबईमधील भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. भाजीपाल्याची आवक घटल्याने परिस्थितीचा गैरफायदा घेत विक्रेत्यांनी ग्राहकांना वेठीस धरले. मात्र आता संप निवळला असल्याने सोमवारपासून भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची आशा आहे. सध्या कोथिंबीर १२० रुपये जुडी व फरसबी १६० रुपये किलोवर पोहोचली आहे. फ्लॉवर, शेवगा, टोमॅटोचे दरही १२० रुपये किलो झाले आहेत. मुंबईकरांना परराज्यातून येणाऱ्या भाजीपाल्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३ जूनला दिवसभरामध्ये ७१ ट्रक व १७८ टेंपोमधून भाजीपाल्याची आवक झाली आहे. मुंबई, नवी मुंबईकरांची मागणी व प्रत्यक्षातील आवक यामध्ये तफावत असल्याने बाजारभाव प्रचंड वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातून अत्यंत अल्प प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येऊ लागला आहे. विक्रीसाठी येणारा ९० टक्के माल हा आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्लीमधून विक्रीसाठी येऊ लागला आहे. लिंबू, आले या वस्तूही दक्षिणेकडील राज्यांतून येऊ लागल्या आहेत. मुंबईत निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे परराज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात माल मुंबईत पाठवत आहेत.
 
५ रुपयांची पुदिना जुडी ३० रुपयांना
शेतकरी संपापूर्वीचे दर आणि सध्याचे दर यात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादर, माटुंगा परिसरातील बाजारपेठेत आधी ५ रुपयांना मिळणाऱ्या पुदिना जुडीसाठी आता ३० रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाज्यांच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. कोबी, फ्लॉवरचा दर ३० रुपये किलोवरून १०० रुपयांवर गेला आहे. १० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो ४० रुपये किलो झाले आहेत. ८ रुपयांना मिळणाऱ्या पालकच्या जुडीसाठी १५ रुपये द्यावे लागत आहेत.
गुजरातहून मुंबईत आला भाजीपाला
शेतकरी संपामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे येणा-या भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळे व्यापा-यांनी गुजरातमधील बाजरांतून भाजीपाला मागवण्यास सुरुवात केली आहे.  
 
(भाजी खरेदीकडे ग्राहकांची पाठ)
महाराष्ट्र बंदचे सावट बाजारातील उलाढालीवर दिसून आले. बंदमुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरविली. त्यामुळे पुण्यातील बाजारात रविवारच्या तुलनेत निम्मीच म्हणजे केवळ ३५ टक्के आवक झाली. आवक कमी होऊनही मागणीअभावी भाज्यांचे भावही निम्म्याने उतरले आहेत.
 
ज्येष्ठ अडते विलास भुजबळ म्हणाले, ‘‘बंदमुळे सोमवारी आवक कमी झाली असली तरी ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली. अनेक किरकोळ विक्रेत्यांनी रविवारीच भाज्यांची मोठी खरेदी केली होती. त्यातच बंदमुळे अनेक जण बाजारात फिरकले नाही. त्यामुळे आवक कमी होवूनही काही प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला. तसेच कांदा, लसूण आणि पालेभाज्या वगळता इतर सर्व भाज्यांचे भाव निम्म्याने खाली आहेत.’’
 
काय आहेत मागण्या
 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने १ जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती.  नगर, नाशिक, औरंगाबादेतून सुरू झालेल्या या आंदोलनाला बघताबघता राज्यव्यापी स्वरुप प्राप्त झाले.

Web Title: Milk tankers brought to Z

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.