गिरणी कामगार कर्जाच्या खाईत
By admin | Published: July 14, 2015 01:20 AM2015-07-14T01:20:19+5:302015-07-14T01:20:19+5:30
मुंबईच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या गिरणी कामगारांना साडेसात लाख रुपये किमतीची ६९२५ घरे घोडपदेव येथे देण्यात आली. मात्र या घरांकरिता कर्ज
मुंबई : मुंबईच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या गिरणी कामगारांना साडेसात लाख रुपये किमतीची ६९२५ घरे घोडपदेव येथे देण्यात आली. मात्र या घरांकरिता कर्ज घेतलेल्या बहुतांश कामगारांनी हप्ते थकवल्याने आता बँकेकडून त्यांना नोटिसा येत आहेत. मात्र हे वास्तव नजरेआड करून १६ लाख रुपये किमतीच्या घरांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.
गिरणी कामगारांच्या संपामुळे हद्दपार झालेल्या कामगाराला पुन्हा मुंबईत हक्काचे घर देण्याकरिता गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. ही घरे मोफत द्यावी, अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेने केली होती. मात्र गिरणी कामगार कृती संघटनेने साडेसात लाख रुपयांना घरे देण्याची सरकारची मागणी मान्य केली. याकरिता मुंबई बँकेने व अन्य काही सहकारी बँकांनी कर्ज दिले. ज्या गिरणी कामगाराला त्याच्या सेवेकरिता तीन ते साडेतीन लाखांपेक्षा जास्त भरपाई मिळाली नाही त्याला हे घर घेणे महागडे ठरेल ही कैफियत सरकार व अन्य कामगार संघटनांनी ऐकून घेतली नाही.
घोडपदेव येथे घरे मिळालेल्या ६९२५ कामगारांपैकी ६०० कामगारांना ऐपत नसल्याने घर घेणे परवडले नाही. सध्या या कामगारांपैकी ४० टक्के कामगारांनी कर्जाचा बोजा परवडत नसल्याने घरे बेकायदा विकल्याचे कामगार संघटनांच्या नेत्यांनी सांगितले. उर्वरित ६० टक्के कामगारांपैकी ९० टक्के कामगारांनी घरे भाड्याने देऊन दहिसर, बदलापूर येथे जाण्याचा पर्याय स्वीकारला
आहे. ज्यांंनी कर्ज फेडून मुंबईत वास्तव्य करण्याचा प्रयत्न
केला त्यापैकी अनेकांचे हप्ते थकले. त्यांना बँकांच्या नोटिसा येत
आहेत. (विशेष प्रतिनिधी)
पवारांचे नेतृत्व हे तर विडंबन
गिरण्यांच्या जमिनी विकसित करण्याकरिता विकास नियंत्रण नियमावलीत १९९१मध्ये केले गेलेले बदल हे शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत झाले. संपाची तीव्रता संपल्यावरही गिरण्यांमध्ये १ लाख ६० हजार कामगार काम करीत होते. गिरणी मालक जमिनीचा विकास करून गिरण्यांचे आधुनिकीकरण करून गिरण्या चालवतील, अशी बतावणी सरकारकडून केली गेली होती. आता त्याच पवार यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांना घरे मिळावीत याकरिता मोर्चा काढणे हे विडंबन असल्याची टीका सर्व श्रमिक संघटनेचे सरचिटणीस विजय कुलकर्णी यांनी केली.
मुंबई टेक्सटाईल मिलमध्ये २५ वर्षे नोकरी केली. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घराकरिता माझी निवड झाली. मुंबई बँकेकडून कर्ज घेऊन घर घेतले. मात्र गेले पाच ते सहा महिने हप्ते न भरल्याने बँकांच्या नोटिसा येत आहेत. माझ्यासारखीच अन्य कामगारांची अवस्था आहे.
- सुभाष पारकर, गिरणी कामगार