लक्षाधीश मधाळ माणूस!
By Admin | Published: December 25, 2016 03:53 AM2016-12-25T03:53:47+5:302016-12-25T03:53:47+5:30
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण गोपालन, कुक्कुटपालन, शेळीमेंढीपालन करतात. परंतु जोडधंदा नव्हे तर मुख्य धंदा म्हणून एक लातूरकर मधमाशा पाळतो.
- दत्ता थोरे, लातूर
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण गोपालन, कुक्कुटपालन, शेळीमेंढीपालन करतात. परंतु जोडधंदा नव्हे तर मुख्य धंदा म्हणून एक लातूरकर मधमाशा पाळतो. तब्बल २४ ते २५ कोटींच्या घरात त्याच्याकडे मधमाशा आहेत. त्यांनी विकसित केलेल्या सातशे पेट्यांमधून या मधमाशा मधाद्वारे आपल्या मालकाला लाखो रुपये कमवून देतात. मधाच्या व्यवसायातून लक्षाधीश होणाऱ्या लातूरच्या या मधाळ माणसाची ही ‘हनी स्टोरी’ !
दिनकर विठ्ठलराव पाटील हे त्या मधाळ माणसाचे नाव. हिंपळनेर (ता. चाकूर) हे त्यांचे गाव. चार एकर वडीलोपार्जित जिरायती शेती. उदगीरमधून बी. कॉम. पूर्ण केलं. शेतीत राम नाही म्हणून काहीतरी करावं म्हणून लातूररोडला आले. तरुणांनी स्वत:च्या पायावर उभं राहीलं पाहीजे, ही त्यांची इच्छा. यातूनच खादी ग्रामोद्योग महामंडळातर्फे त्यांनी तरुणांसाठी ‘मधुमक्षिका पालनाची कार्यशाळा’ घेतली. या कार्यशाळेत प्रेरित होऊन स्वत:च व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन सुरू केले.
प्रशिक्षणानंतर पाच पेट्या घेऊन त्यांनी याचा श्रीगणेशा केला. गेल्या दहा वर्षांत या पाचवरुन त्यांनी आपला व्यवसाय सातशे पेट्यांपर्यंत नेला आहे. एका पेटीत दहा पोळ्यावर २५ ते ३० हजार मधमाशा असतात. पहिल्या वर्षी ५० किलो प्रती पेटीप्रमाणे २५० किलो मध त्यांना मिळाले. हे त्यांनी महाबळेश्वरच्या खादी ग्रामोद्योगला विकले. नंतरनंतर १२ टनापर्यंत खादी ग्रामोद्योगने त्यांचे मध विकत घेतले. परंतु त्याहून जास्त उत्पन्न झाल्याने पाटील यांनी स्वत: बाजारात एन्ट्री केली. वेगळी वाट चोखाळणाऱ्या दिनकर पाटील यांना मुंबईच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार आणि ‘आयबीएन लोकमत’चा ‘जागर बळीराजाचा’ असे दोन पुरस्कारही मिळाले.
उद्योगासाठी मधुमक्षिकेचे भारतभ्रमण !
आपल्याकडे खरिपाचा हंगाम संपला की फार-फार तर डाळींबा हंगाम सापडतो. फुलं असली तरच परागकण मिळतात आणि मधमाशा मध बनवितात. पण आपल्याकडील हंगाम संपल्यावर पाटील आपल्या पेटी राज्यस्थानात फेब्रुवारीपर्यंतच्या मोहरी, कोथिंबिरीच्या हंगामासाठी, पंजाब व जम्मू आणि कश्मीरचा कडिपत्ता सिझन असे भारतभर नेतात. तेथील शेतकऱ्यांशी व्यवसायिक करार करुन त्यांच्या शेतात मध गोळा करण्यासाठी पेट्या ठेवतात. विशेष म्हणजे संरक्षणाला आपल्याकडचे कामगार ठेवतात.
मधाचे नॅचरल
प्लेवर मिळविले !
मोहरीच्या शेतात ठेवलेल्या पेट्यातून त्यांनी मोहरी फ्लेवरचा, तिळाच्या शेतातून तिळ फ्लेवरचा असे वेगवेगळ्या प्रकारच्या शेतातून नॅचलर फ्लेवर्स पाटील यांनी मिळविले.
तीळ, कोथिंबीर, कडीपत्ता, ओवा असे फ्लेवर मिळविले. अगदी कुर्डू या गवतापासूनही त्यांनी मध मिळविला हे विशेष.