विदर्भात लाखो कृषी पंपाचे उर्जीकरण!
By admin | Published: April 4, 2017 12:12 AM2017-04-04T00:12:14+5:302017-04-04T00:12:14+5:30
गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे.
आठ जिल्ह्यातील चित्र : कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण!
ब्रम्हानंद जाधव - बुलडाणा
कृषी पंपाना विद्युत जोडणी करून कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत १ लाख ७० हजार २६० कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले असून गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे.
कृषी पंपांना वीज जोडण्या उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. डॉ. दांडेकर समितीने १९८४ मध्ये तसेच अनुशेष व निर्देशांक समितीने १९९७ मध्ये सादर केलेल्या अहवालात कृषी पंपांचा अनुशेष ठरवताना प्रत्येक जिल्ह्यात ऊर्जीकरण झालेले एकूण कृषी पंप आणि एकूण पिकाखालील क्षेत्र याचा विचार करून प्रती हजार हेक्टर पिकाखालील क्षेत्रामागे असलेले कृषी पंप यांची सरासरी काढली, तसचे ज्या जिल्ह्याची सरासरी राज्यापेक्षा जास्त आहे, तेथे अनुशेष नाही आणि राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनुशेष आहे, असे ठरवण्यात आले होते. राज्य सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या कृषी पंपांची संख्या गृहित धरून भौतिक अनुशेष ठरवण्यात आला होता. त्यानुसार विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या नऊ जिल्ह्यांत १ लाख ७१ हजार ७४२ अशाप्रकारे कृषीपंप विद्युतीकरणाचा अनुशेष निर्धारित केला होता. विदर्भातील या जिल्ह्यांकडे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यांमधील कृषी पंप विद्युतीकरणाचा अनुशेष कायम राहत होता. परंतू सध्या विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये १ लाख ७० हजार २६० कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यात ४१ हजार ४६३ कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात ७ हजार २३, यवतमाळ जिल्ह्यात ४७ हजार ७७६, वर्धा जिल्ह्यात २ हजार ७३९, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १६ हजार ७४६, चंद्रपूर जिल्ह्यात ३८ हजार ७९२, गडचिरोली जिल्ह्यात १५ हजार ७२१ कृषी पंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे. कृषी पंप विद्युतीकरणाचे अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भातून निवडलेल्या आठ जिल्ह्यापैकी केवळ गडचीरोली जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला नाही.
दोन जिल्ह्यांचा अनुशेष शिल्लक
अनुशेष व निर्देशांक समितीने कृषीपंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष घोषीत केलेल्या १५ जिल्ह्यात अनुशेष शिल्लक होता. त्यापैकी सध्या रत्नागिरी व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील अनुशेष शिल्लक आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकरी या योजनेंअतर्गत कृषीपंप वीज जोडणी घेण्यास पात्र राहणार आहेत. तसेच १०७ अश्वशक्तीपर्यंत वीजभार असलेल्या कृषीपंपानाच सदर योजनेंतर्गत वीज जोडणी घेण्यासाठी लाभार्थी पात्र राहणार आहेत.