‘गोकुळ’मध्ये कोट्यवधींचा ढपला
By admin | Published: July 3, 2016 01:04 AM2016-07-03T01:04:13+5:302016-07-03T01:05:04+5:30
सतेज पाटील यांचा आरोप : सहायक दुग्ध निबंधकांकडे चौकशीची मागणी
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये दूध वितरण टेंडर, टॅँकर भाडे, अॅल्युमिनियम कॅन खरेदी, कडबा कुट्टी यंत्रे, आदींमध्ये नेत्यांसह संचालकांनी कोट्यवधींचा ढपला पाडल्याचा आरोप करीत गोरगरीब हाडांची काडे करून संघाकडे दूध घालतात, त्यावर डल्ला मारणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सहायक निबंधक (दुग्ध) अरुण चौगले यांच्याकडे शनिवारी केली.
संघातील भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरच ‘गोकुळ’ची निवडणूक लढविली. सभासदांमधील रोषामुळेच सत्ता राखताना नेत्यांची दमछाक झाली. सभासदांचा कौल पाहून ते किमान शहाणपणाने कारभार करतील असे वाटत होते; पण ते सुधारत नसल्याने रस्त्यावर येण्याची वेळ आली. मुंबईत ‘गोकुळ’चे दूध वितरण करणारी ‘कोल्हापूर आइस अॅँड कोल्ड स्टोअरेज’ ही कंपनी कोणाची आहे, वितरणाचा ठेका देताना टेंडर काढले जाते का? पुणे, मुंबई मार्गांवर दूध वाहतूक करणाऱ्या टॅँकरना भरमसाट भाडे देऊन त्यातून संचालक व नेत्यांची कोट्यवधींची लूट सुरू आहे. येथे अधिकाऱ्यांपासून सगळ्या यंत्रणेला ‘सांभाळून’ घेतले जात असल्याने प्रक्रिया खर्च वाढत आहे. ‘अमोल’सारखा स्पर्धक बाजारात आला आहे. एक रुपया जास्त दर देऊन त्याने बस्तान बसविले, तर ‘गोकुळ’च्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. आमचा ‘गोकुळ’ टिकविण्यासाठी प्रयत्न आहे. सर्वसाधारण सभेत आम्ही याचा जाब विचारणार आहोतच; पण कायदेशीररीत्या चौकशीची मागणी करीत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
करवीरच्या सभापती स्मिता गवळी, अंजना रेडेकर, विजयसिंह मोरे, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष किशोर पाटील, बाबासाहेब चौगले, किरणसिंह पाटील, मनीषा वास्कर, मंगल वळकुंजे, एकनाथ पाटील, नाना हजारे, हंबीरराव वळके उपस्थित होते.
‘अमरीश’ने शेतकऱ्यांचे हित बघावे
सभासदांनी आम्हाला पाठबळ दिल्याने दोन संचालक निवडून आले. स्वर्गीय चंद्रकांत बोंद्रे ताकदीने विरोध करायचे; पण अमरीश घाटगे विधान परिषदेच्या निवडणुकीपासून बाजूला गेले आहेत. त्यांच्यासह संचालकांना विनंती आहे की, त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करावा, असे पाटील यांनी सांगितले.
उपऱ्या नेत्यांच्या जिवावर किती दिवस?
संघाचा कारभार एका परजिल्ह्यातील उपऱ्या नेत्याच्या इशाऱ्यावरच चालत आहे. स्वाभिमान असेल तर संचालकांनी जागे होऊन बाणेदारपणा दाखवून शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करावा, असा टोला पाटील यांनी महादेवराव महाडिक यांना हाणला.
महाडिक यांचा डाव हाणून पाडला!
‘गोकुळ’ला मल्टिस्टेट करून त्याचे खासगीकरण करण्याचा महादेवराव महाडिक यांचा डाव होता. तो आम्ही हाणून पाडला. येथील उत्पादकांकडे दुर्लक्ष करून, कर्नाटकातून दीड लाख लिटर दूध आणले जाते, यामागील गौडबंगाल काय? असा सवालही पाटील यांनी केला.
विश्वास पाटील संपर्काबाहेर ?
आमदार पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाबद्दल संघाची बाजू समजून घेण्यासाठी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
संचालकांनी याची उत्तरे द्यावीत
४मुंबईत दूध वितरण करणारी ‘कोल्हापूर आइस कंपनी’ कोणाची? वितरणाचे टेंडर काढले जाते का?
४टॅँकर भाडे व्यवहाराशी सुसंगत आहे का?
४बल्क कुलर्स खरेदीमध्ये गैरव्यवहार
४साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त लोण्याचे उत्पादन करून परजिल्ह्यांतील शीतगृहांत ठेवून त्यात संघाचे दोन कोटींचे नुकसान करून कोणाचे हित करता?
४अॅल्युमिनियम कॅन खरेदीत कोणी गैरव्यवहार केला?
४निकृष्ट दर्जाची कडबाकुट्टी यंत्रे शेतकऱ्यांच्या माथी मारणारा
व्यापारी कोण?
४उत्पादकांकडून नियमबाह्य कपात केलेल्या १६.४२ कोटींवर नेते व संचालकांची चैन कशी?