लाखो डोळ्यांनी पाहिला रिंगण सोहळा !
By Admin | Published: July 6, 2016 05:43 PM2016-07-06T17:43:26+5:302016-07-06T17:43:26+5:30
याचि देही, याचि डोळा अगा म्या पाहिला माउलींचा रिंगण सोहळा..! टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ह्यमाउली-माउलीह्णचा जयघोष, रोखलेला श्वास आणि उत्सुक नजरा
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ६ : याचि देही, याचि डोळा अगा म्या पाहिला माउलींचा रिंगण सोहळा..! टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ह्यमाउली-माउलीह्णचा जयघोष, रोखलेला श्वास आणि उत्सुक नजरा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या अश्वाने वेगाने धाव घेत चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर सारा आसमंत विठ्ठलनामाच्या जयघोषणात दुमदुमून गेला.
हा नयनरम्य सोहळा लाखो भक्तांनी डोळ्यांत साठविला. लोणंद येथील एक दिवसाचा मुक्काम आटोपून माउलीची वारी बुधवारी दुपारी तरडगावकडे मार्गस्थ झाली. माउलींचा मानाचा नगारखाना रिंगणस्थळी आला, तेव्हा पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. या पावसाच्या सरीतच वारक-यांनी नाचण्यास सुरुवात केली. सायंकाळी चांदोबाचा लिंब येथे पोहोचल्यानंतर चोपदारांनी रिंगण लावून घेतले.
रिंगणाचा सोहळा 'याचि देही, याचि' डोळा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लोक आले होते. धावत येणारा माउलींचा अश्व पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा आतूर झाल्या होत्या. अशातच माउलींचा अश्व व स्वाराचा अश्व एकमेकापाठोपाठ धावत आले. रथापुढील व मागील दिंड्यांपर्यंत धावत गेल्यावर पुन्हा अश्व रथाकडे वळून, त्यातील पादुकांचे दर्शन घेतले गेले.
यावेळी अश्वांना नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्वांनी धाव घेत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर अश्वांच्या टापांची माती ललाटी लावण्यासाठी वारक-यांची एकच झुंबड उडाली. यावेळी असंख्य वारकरी पारंपरिक खेळ खेळण्यात दंग होते. त्यानंतर डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भागवत पताका घेऊन वैष्णव ह्यग्यानबा-तुकारामह्ण असा जयघोष करत होते.