कायद्याच्या जाणकाराची लाखोंची फसवणूक

By admin | Published: October 7, 2016 05:29 AM2016-10-07T05:29:32+5:302016-10-07T05:29:32+5:30

वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या हायकोर्टाच्या वकिलाला आपल्याला चार कोटींची लॉटरी लागल्याचा ई-मेल आला आणि कायद्याचा जाणकार असलेल्या वकिलाची नियत फिरली

Millions of law falsifiers fraud | कायद्याच्या जाणकाराची लाखोंची फसवणूक

कायद्याच्या जाणकाराची लाखोंची फसवणूक

Next

मुंबई : वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या हायकोर्टाच्या वकिलाला आपल्याला चार कोटींची लॉटरी लागल्याचा ई-मेल आला आणि कायद्याचा जाणकार असलेल्या वकिलाची नियत फिरली. अर्ध्याहून अधिक आयुष्य फसवणुकीचे खटले लढण्यात गेले असतानाही हा वकील ठगाच्या जाळ्यात अडकला. या वकिलाची ठगांनी १८ लाखांची फसवणूक केली. वकिलांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.
काळाचौकी परिसरात तक्रारदार वकील कुटुंबीयांसोबत राहतात. गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या काळात जेकब अ‍ॅण्डरसन याने मेलद्वारे तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. मुकेश अंबानी फाउंडेशनतर्फे आपल्याला ४.५ करोडची लॉटरी लागली आहे. ब्रिटिशांनी दावा न केलेल्या पैशांतून बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. करोडपती होण्याच्या नादात कायद्याचे ज्ञान विसरून, अनुभव विसरून त्यांनी या मेलला रिप्लाय दिला. मासा गळाला लागल्याचे लक्षात येताच या ठगाने सुरुवातीला प्रोसेसिंग फी म्हणून ९ हजार रुपये द्यावे लागतील असे कळविले. उत्साहाच्या भरात वकिलाने ही रक्कम मनी ट्रान्सफरद्वारे पाठविली. त्यानंतर मालेगम आणि अल्पना शर्मा यांच्या नावाने त्यांना मेल आले. त्यांनी सांगितल्यानुसार, तक्रारदार हे पैसे देत गेले. घरच्यांना सरप्राइज देण्यासाठी त्यांनी त्यांनाही याबाबत अंधारात ठेवले. जवळपास ४० वेळा केलेल्या व्यवहारादरम्यान वकिलाने १८ लाख ३६ हजार रुपये या टोळीला दिले. ही टोळी मेलद्वारे आरोपींच्या संपर्कात होती. पैसे देण्यास उशीर होताच त्यांना फोन करून संपर्क साधायची.
त्यांनी दिलेले पैसे हे दिल्ली, चेन्नई, कोलकाता या भागातून काढण्यात आले आहेत. काळाचौकी पोलीस कॉल रेकॉर्डवरून या आरोपींचा शोध घेत आहेत. उच्च न्यायालयात वकील असलेले तक्रारदार यांनी आजवर अनेक खटले लढविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे ब्रेनवॉश करून या जाळ्यात अडकविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय मनी ट्रान्सफरद्वारे त्यांनी दिलेल्या पैशांच्या पावत्याही त्यांच्याकडे आहेत.
पत्नीला या प्रकाराची कुणकुण लागताच हे प्रकरण उजेडात आले. त्यांनी याबाबत मित्र आणि नातेवाइकांकडे विचारणा केली आणि पतीसह काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Millions of law falsifiers fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.