...तर इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही; दसरा मेळाव्यात खा. प्रीतम मुंडेंचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 03:58 PM2023-10-24T15:58:22+5:302023-10-24T15:59:00+5:30
तुम्ही प्रतिक आहात निष्ठेचं आणि ही निष्ठा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडत नाही. कोणत्या दबावापुढे कधीही झुकत नाही असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं.
बीड - तुमची शक्ती आणि शिवशक्ती परिक्रमेनंतर ताई देवळातील ज्योतीप्रमाणे आपल्याला भासतात. या ज्योतीत पावित्र्य आणि निष्ठा आहे. दिलेला शब्द पाळण्याची ताकद आहे. त्या ज्योतीत निस्वार्थीपणे सेवा करण्याची भावना आहे. त्यामुळे पंकजाताईंच्या पराक्रमाची ज्योत आणि तुमची शक्ती एकत्र आल्यावर इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या. दसऱ्यानिमित्त सावरगावात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं की, केवळ बीडच नव्हे तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातूनही लाखोंच्या संख्येने लोकं उपस्थित आहेत त्याबद्दल मी धन्यवाद करते. मला आजही आठवते, गोपीनाथ मुंडे भगवान गडावरुन दर्शन घेऊन घरी परतायचे. सीमोल्लंघन केल्यानंतर आम्ही त्यांना औक्षण करायचो. तेव्हा साहेब काहीतरी सोन्याची वस्तू ओवाळणी म्हणून द्यायचे. आज घरी परत गेल्यावर ओवाळण्यासाठी मुंडे साहेब नाहीत. पण त्यांनी दिलेली लाखो सोन्याची माणसं ही आमची मोठी संपत्ती आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत लोकं राजकारणात येऊन काय कमावतात? कुणी पदं, कुणी प्रतिष्ठा तर कुणी संपत्ती कमावतं, आम्ही काय कमावलं तर हा लाखोंचा जनसमुदाय कमावला. हीच आमची खरी संपत्ती आहे. पण हा जनसागर शांत नाही. निखारा आहे. प्रत्येक माणूस हा संघर्षाचा प्रतिक आहे. हा संघर्ष आहे वंचितांसाठी, गरिबांसाठी जो मुंडे साहेबांनी त्यांच्या ४० वर्षाच्या राजकारणात केला. त्यानंतर १० वर्ष संघर्ष पंकजाताई करतायेत. त्या संघर्षाला तुम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून सोबत दिली असंही प्रीतम मुंडें म्हणाल्या.
दरम्यान, तुम्ही प्रतिक आहात निष्ठेचं आणि ही निष्ठा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडत नाही. कोणत्या दबावापुढे कधीही झुकत नाही. तुम्ही प्रतिक आहात सबुरीचं, आपल्या लोकनेत्याच्या लेकीला त्रास होऊ नये म्हणून अतिशय शांतपणे, ताईंच्या आदेशाची वाट बघणाऱ्या सबुरीचे प्रतिक आहे. भगवानबाबांनी आपला स्वाभिमान दिला, मुंडे साहेबांनी हा स्वाभिमान कधी आपल्याला कुणासमोर गहाण टाकू नाही दिला. आजकाल काहींना स्वत:च्या वाढदिवसाचे बॅनरही पदरचे पैसे खर्च करून लावावे लागतात. पण हा तुमचा स्वाभिमान आहे, ताईंवर संकट आल्यानंतर २ दिवसांत कोट्यवधी निधी गोळा करणारे तुम्ही आहात. तुमचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत अशा शब्दात प्रीतम मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.