खासदार मामाच्या नावाने लाखोंचा गंडा

By Admin | Published: November 4, 2016 05:23 AM2016-11-04T05:23:10+5:302016-11-04T05:23:10+5:30

हॅलो मी खासदारांचा भाचा बोलतोय. तुम्हाला शाळा, महाविद्यालयात अ‍ॅडमिशन करायचे आहे का?

Millions of people in the name of MP Mama | खासदार मामाच्या नावाने लाखोंचा गंडा

खासदार मामाच्या नावाने लाखोंचा गंडा

googlenewsNext

मनीषा म्हात्रे,

मुंबई- हॅलो मी खासदारांचा भाचा बोलतोय. तुम्हाला शाळा, महाविद्यालयात अ‍ॅडमिशन करायचे आहे का?..असे विचारून पालकांना अ‍ॅडमिशनच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या पदवीधर ‘भाच्या’ला भांडुप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हेमंत हरीश देवाडिगा (३३) असे या भामट्याचे नाव असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
भांडुप परिसरात राहणाऱ्या प्रशांत कदम यांनी मुलाला ज्युनिअर केजीमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी कांजुर येथील सेंट झेवियर्स शाळेत अर्ज केला होता. मात्र तो अर्ज नाकारला. हेमंतने माजी खासदार संजय पाटील यांचा भाचा असल्याचे सांगून त्यांच्या ओळखीने मॅनेजमेंट कोट्यातून अ‍ॅडमिशन करून देतो असे सांगितले. पाटलांचा भाचा असल्याने आपले काम लवकर होईल, या आशेने कदम यांनी त्याला होकार दिला. त्याने सुरुवातीला ३० हजार रुपये कदम यांच्याकडून उकळले. त्यानंतर गोदरेजमध्ये काम मिळवून देण्याचे अमिष दाखवून आणखी ४७ हजार रुपये घेतले. अ‍ॅडमिशन झाले असे दाखवण्यासाठी त्याने शाळेचे पत्र दिले. मात्र हे पत्र घेऊन कदम शाळेत गेले तेव्हा असे पत्र दिले नसल्याची माहिती त्यांना शाळेकडून मिळाली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी १३ आॅक्टोबरला भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन गिजे यांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांच्यासह आणखीन ८ ते ९ तक्रारी दाखल झाल्या. खासदारांच्या नावाचा वापर करुन अनेकांची फसवणूक केल्याचे दिसून आले. हेमंत भांडुप परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच गिजे यांनी सापळा रचून त्याला अटक केली.
गेल्या वर्षीही हेमंतला फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. सर्वोदयनगर परिसरात राहणारा हेमंत राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार व ईशान्य मुंबईचे अध्यक्ष संजय पाटील यांचा भाचा लागतो. त्यांचे सावत्र भाऊ कमलाकर पाटील यांच्या बहिणीचा तो मुलगा आहे.
>स्वत:च्याच शाळेला केले टार्गेट
हेमंतने कांजुरच्याच सेंट झेवियर्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ज्या शाळेत शिक्षण पूर्ण केले त्याच शाळेला त्याने लक्ष्य केले होते. त्याने पालकांना मॅनेजमेंट कोट्यातून अ‍ॅडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. याच्याशिवाय पूर्व उपनगरांतील विविध शाळा, महाविद्यालयांकडेही त्याने मोर्चा वळविला होता.
>ऐशोआरामासाठी प्रताप
फसवणुकीतून मिळालेले पैसे तो ऐशोआरामासाठी उडवित होता. पार्ट्या, महागड्या हॉटेलमध्ये जेवण आणि मित्रांसोबत उधळपट्टी करण्यासाठी तो हे पैसे खर्च करत असल्याचे तपासात समोर आले.
>माजी खासदारांचाही जबाब घेणार
संजय पाटील यांच्या नावाचा वापर हेमंत
करत असल्याने या प्रकरणात पाटील यांचाही जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली.

Web Title: Millions of people in the name of MP Mama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.