फुलशेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:23 AM2018-10-08T11:23:26+5:302018-10-08T11:23:33+5:30

यशकथा : दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात.

Millions of rupees earned by farmer from flower farming | फुलशेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

फुलशेतीतून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये

googlenewsNext

- यमन पुलाटे (लोणी, जि. नगर)
 

फुलशेतू ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करू शकते; पण यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्याची गरज आहे. असे केले तर ही शेती कमी खर्चात लाखांचे उत्पादन देणारी आहे, असा अनुभव नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील शेतकरी लक्ष्मण पुलाटे यांचा आहे.
दुर्गापूर येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील २० वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात. सुरुवातीला अनेक प्रश्न, समस्या त्यांच्यासमोर होत्या; पण बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रातील विस्तार विभागाचे प्रमुख सुनील बोरुडे यांनी या फूल उत्पादकांना एकत्र करीत शेतकरी गटांची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून फुलशेतीला चांगले दिवस आले, असे लक्ष्मण पुलाटे सांगतात. येथील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दवणे, शांताराम सोनवणे यांनी लागवड, खत व्यवस्थापन, पीकसंरक्षण बाजारपेठ याची माहिती दिल्याने फुलशेतीला चांगले दिवस आले.

आज या शेतीच्या माध्यमातून फुलशेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर सध्या भर दिल्याने पूर्वीपेक्षा खर्चात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे. झेंडू पिकांची लागवड जून-जुलै, डिसेंबर-जानेवारी अशा दोन वेळेस करता येते. लागवडीपूर्वी चांगली मशागत करून चार फुटांच्या बेडवर एक टन गांडूळ खत, निंबोळी पेंड याबरोबर जैविक बुरशीनाशके आणि जिवाणू खतांचा वापर करून लागवड केली जाते. प्रत्येक वेळी लागवडीपूर्वी माती परीक्षण करून ८० टक्के  सेंद्रिय खते, तर २० टक्के  रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे खर्चात बचत, फुलांची गुणवत्ता, झाडांची वाढ चांगली होते. लागवडीनंतर दोन तोडणीनंतर व्हर्मीवॉश आणि शेण-गोमूत्र स्लरीचा आलटून पालटून ठिबक आणि फवारणीतून वापर करण्यात येतो. गरज असेल तर विद्राव्य खतांचा वापर करतात. शेवंती आणि बिजली हे स्थानिक वाण तर झेंडूसाठी आफ्रिकन यलो, गोल्ड स्पॉट, अप्सरा यलो या वाणांचा वापर केला जातो.

बागायती भागात आणि जिरायती भागात फुलशेती करता येते. पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. प्रत्येक संकटासोबत संधी असते ती शोधून काम करणारा पुढे जाऊ शकतो. यासाठी ग्रुप संघटन आणि पीक गट यांचा फायदा होतो, असेही पुलाटे यांनी सांगितले. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीला प्रारंभ होईल. त्यानंतर दसरा, दिवाळी सण आहे. फुलांच्या दृष्टीने हे तीनही सण अत्यंत महत्त्वाचे असून, या दरम्यान फुलांना प्रचंड मागणी असते. आवक कमी झाल्यास फुलांचे दर वाढतात आणि जास्त झाल्यास दर घटतात, असा अनुभव आहे. तथापि, यातूनही चार पैसे हातात पडून दसरा, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याची योजना शेतकऱ्यांची आहे.

Web Title: Millions of rupees earned by farmer from flower farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.