रक्तपेढींच्या बनावट पावत्यांच्या आधारे हडपले लाखो रुपये!
By admin | Published: October 30, 2015 01:40 AM2015-10-30T01:40:27+5:302015-10-30T01:40:27+5:30
पोलीस पुत्राचा कारनामा, आरोपी गजाआड.
अकोला: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचे प्रकरण संपत नाही, तोच पुन्हा जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला फसविल्याचे प्रकरण गुरुवारी उघडकीस आले. शहरातील रक्तपेढींच्या नावाच्या बनावट पावत्यांच्या आधारे शासनाच्या तिजोरीवरच डल्ला मारण्याचे काम एक पोलीस पुत्र करीत होता. रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी त्याला स्त्री रुग्णालयातून अटक केली आणि त्याच्याकडील रक्तपेढय़ांच्या अनेक बनावट पावत्या जप्त केल्या. जिल्हा स्त्री रुग्णालय कार्यालयातील अधीक्षक प्रकाश महादेवराव वाडेकर यांच्या तक्रारीनुसार, गंगानगर परिसरात राहणारा सोहेल अहमद खान कुदरतउल्लाह खान (३२) हा गत २0१२ पासून, रुग्णालयामध्ये दारिद्रय़रेषेखालील गरजू स्त्री, पुरुषांना आणून, त्यांच्याकडे शहरातील जीवन रक्तपेढी, साईजीवन रक्तपेढी, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, पिंपरकर रक्तपेढी आदींच्या नावाच्या बनावट पावत्या देऊन स्त्री रुग्णालयात पाठवत असे. रक्तपेढय़ांच्या या बनावट पावत्यांच्या आधारे तो दररोज ७ ते ८ हजार रुपये काढत असे. गत दोन ते तीन वर्षांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरू आहे. विशेष म्हणजे, सोहेलचे आई व वडील दोघेही पोलीस खात्यातून सेवानवृत्त झाले आहेत. स्त्री रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक शिवहरी लांडे यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने, सोहेल अहमद खानने त्यांच्याकडे पाठविलेल्या महिलांना बसवून ठेवले. त्यामुळे सोहेल अहमद खान हा त्यांच्या कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेला. दरम्यान, लांडे यांनी रामदासपेठ पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने रुग्णालयाची फसवणूक केल्याचे कबूल केले. रामदासपेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१, ४७0 नुसार गुन्हा दाखल केला.