‘समृद्धी’साठी कोटींचा, तर नासासाठी जमिनीला मिळाला केवळ लाखांचा भाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 02:10 AM2018-09-03T02:10:31+5:302018-09-03T07:40:01+5:30
समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीन कोटींचा, तर हिंगोली जिल्ह्यातील नासा प्रयोगशाळेसाठी जमिनी गेलेल्या शेतक-यांना मात्र केवळ साडेचार लाखांचा भाव दिल्याने ४३ शेतक-यांमध्ये मोठा असंतोष आहे.
- गजानन वाखरकर
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीन कोटींचा, तर हिंगोली जिल्ह्यातील नासा प्रयोगशाळेसाठी जमिनी गेलेल्या शेतक-यांना मात्र केवळ साडेचार लाखांचा भाव दिल्याने ४३ शेतक-यांमध्ये मोठा असंतोष आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जमीन गेलेल्या शेतक-यांना हेक्टरी किमान २८ लाखांपासून तीन कोटींपर्यंत भाव मिळाला आहे. नासाच्या प्रकल्पात मात्र हेक्टरी केवळ चार लाख ४२ हजारांचा भाव देण्यात आला आहे.
गुरुत्वीय लहरींचा सुक्ष्म अभ्यास करण्यासाठी नासा व लिगो इंडियाची संयुक्त प्रयोगशाळा औंढा तालुक्यात होत आहे. त्यासाठी दोन गावांमध्ये भूसंपादन झाले असून १0.२४ कोटींच्या मोबदल्याचे वाटप सुरू झाले आहे. १२ शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. या प्रकल्पासाठी सिद्धेश्वर व दुघाळा परिसरातील ४३ शेतकºयांची ४४.७३ हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. सिद्धेश्वरच्या जमिनीसाठी ३.५६ कोटी तर दुधाळासाठी ६.८० कोटी असा एकूण केवळ १०. ३७ कोटींचा निधी अणुऊर्जा विभागाने वसमत उपविभागाकडे वर्ग केला आहे. २१ आॅगस्टपासून नोंदणी करून जमिनीचे हस्तांतरण सुरू झाले आहे. समृद्धीच्या तुलनेत अगदी कमी मोबदला मिळत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष आहे.
बागायतीनुसार मोबदला मिळावा
- सध्या आम्हाला कोरडवाहू जमिनीनुसार मोबदला दिला जात आहे. मात्र आमची बागायती जमीन असल्याने मोबदल्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केल्याची माहिती प्रकाश राठोड यांनी दिली आहे.
- लिगो प्रकल्प हा जागतिक दर्जाचा आहे. त्यामुळे ‘समृद्धी’ महामार्ग योजनेनुसार मोबदला देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त डॉ. केशव वाघमारे यांनी केली आहे.
शेतकरी जमीन (हेक्टर) मोबदला
विजयकुमार शिंदे ६ हेक्टर २५ आर १ कोटी ३५ लाख
बबन शिंदे ७ हेक्टर ७४ आर १ कोटी ६४ लाख
खुर्शिद पठाण ३.४३ हेक्टर ७८ लाख ९५ हजार
प्रभाकर दत्तात्रय — ७५ लाख ९५ हजार
महेबुब सरवर — ५६ लाख
प्रकाश राठोड — ४४ लाख २२ हजार
दीपक व अविनाश राठोड — ८१ लाख ६० हजार
सिद्धेश्वर सेवाभावी संस्था — ४८ लाख २ हजार
यसाजी कोकाटे — ३२ लाख ७२ हजार