लाखो टन डाळ मुंबईच्या बंदरात!
By admin | Published: October 30, 2015 01:32 AM2015-10-30T01:32:08+5:302015-10-30T01:32:08+5:30
सात दिवसात राज्य सरकारने राज्यभर छापे टाकून ८६,६६४.९३ मेट्रीक टन डाळ जप्त केली असताना, दुसरीकडे मुंबईच्या बंदरात १ लाख ७५ हजार मेट्रीक टन डाळ आली आहे.
अतुल कुलकर्णी, मुंबई
सात दिवसात राज्य सरकारने राज्यभर छापे टाकून ८६,६६४.९३ मेट्रीक टन डाळ जप्त केली असताना, दुसरीकडे मुंबईच्या बंदरात १ लाख ७५ हजार मेट्रीक टन डाळ आली आहे. शिवाय १५ नोव्हेंबरपर्यंत आणखी ५ लाख ४१ हजार मेट्रीक टन डाळ मुंबईच्या बंदरात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाळ खुल्या बाजारात येईल या भीतीने साठेबाजांचे धाबे दणाणले असून, त्यांनी सरकारशी भावाच्या बाबतीत तडजोड सुरू केली आहे.
आम्ही १२० रुपये किलोने तूर डाळ विक्रीसाठी देऊ, असा प्रस्ताव ठोक विक्रेत्यांच्या संघटनेने सरकारला दिला आहे. मात्र, ग्राहकांना ८० ते ९० रुपये किलोने डाळ दिलीच पाहिजे नाहीतर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी दिली आहे. परिणामी बुधवारी दिवसभर आणि रात्री दोन वाजेपर्यंत बापट यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात अधिकारी, व्यापाऱ्यांच्या शिष्ठमंडळाची खलबते सुरु होती.
सरकारने सहा महसुल विभाग आणि मुंबई, ठाणे परिसरात ४४३६ ठिकाणी छापे टाकले आहेत, तर २४ ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
या छाप्यांत ३२२ कोटी २४ लाख ६९ हजार ६१३ रुपयांच्या डाळी पकडण्यात आल्या आहेत. पकडण्यात आलेल्या ८६,६६४.९३ मेट्रीक टन डाळींपैकी एकट्या मुंबईत ४८,१६२.८१ मेट्रीक टन डाळीचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे, नवी मुंबई, पुणे येथील पोलीस आयुक्तांना या छाप्यांचे नियोजन स्वत: करण्याचे आदेश दिले होेते. यामुळे हादरलेल्या व्यापाऱ्यांनी आम्ही १२० किलो दराने तूरडाळ देऊ, असा प्रस्ताव गुरुवारी सरकारकडे दिला आहे.
मात्र येत्या काही दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणावर डाळ उपलब्ध होणार असल्याने किमती ८० ते ९० रुपयांवर येतील हे लक्षात आल्याने व्यापाऱ्यांनी ही खेळी खेळली आहे. यामागे मंत्रालयातील संबंधीत विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत का, याची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाने गोळा केली आहे.