लाखो वैदर्भीय विदर्भ बंधनात
By admin | Published: August 10, 2014 01:38 AM2014-08-10T01:38:01+5:302014-08-10T01:38:01+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमंच या सामाजिक संघटनेतर्फे क्रांतिदिनी विदर्भात ‘रेल देखो बस देखो आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाला विविध संघटनांसह प्रवासी नागरिकांनी
रेल देखो बस देखो आंदोलन : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमंच या सामाजिक संघटनेतर्फे क्रांतिदिनी विदर्भात ‘रेल देखो बस देखो आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाला विविध संघटनांसह प्रवासी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जय विदर्भ लिहिलेली टोपी घालून ‘विदर्भ बंधन’ बांधून घेतले. संपूर्ण विदर्भात तब्बल तीन लाख लोकांनी आपल्या हातावर ‘विदर्भ बंधन’ बांधून घेत स्वतंत्र विदर्भासाठी लढण्याचा संकल्प केला.
जनमंचतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा सर्वदूर पोहोचवून अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत विदर्भात सुमारे ३३ ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. नागपुरात गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रत्येक प्रवाशांना जय विदर्भ लिहिलेली टोपी घालण्यात आली. तसेच त्यांच्या हाताला जय विदर्भ लिहिलेला बेल्ट बांधून त्यांना विदर्भ बंधनात बांधण्यात आले. प्रवासी नागरिक स्वत: उत्स्फूर्तपणे टोपी व विदर्भ बंधन बांधून घेण्यासाठी पुढाकार घेत होते. याप्रसंगी आंदोलकांनी जय विदर्भच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘विदर्भ हमारी शान है, विदर्भ हमारी जान है, हर हर विदर्भ घर-घर विदर्भ, अब की बार विदर्भ की सरकार’ या घोषणाही प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होत्या.
गोंधळ आणि सप्तखंजेरीद्वारा जागर
नागपुरातील मध्यवर्ती बसस्थानकावर आंदोलनादरम्यान गोंधळ आणि सप्तखंजेरीद्वारा लोकांना जागृत करण्यात आले. दसरा रोड येथील प्रभाकर सूर्यवंशी आणि ओमप्रकाश सूर्यवंशी यांनी गोंधळ सादर करून लोकांमध्ये विदर्भ राज्यासाठी लढण्याची प्रेरणा निर्माण केली. तर तुषार सूर्यवंशी या तरुणाने सप्तखंजेरीद्वारा विदर्भावरील अन्यायाचा पाढा वाचून लोकांना स्वतंत्र विदर्भासाठी प्रेरित केले. प्रेमलाल सूर्यवंशी, पांडुरंग अहिरकर, निवृत्ती आजनकर, अभिराज अहिरकर यांनी त्याला साथ दिली.