एमआयएमला फुटीचे ग्रहण
By admin | Published: January 20, 2017 04:16 AM2017-01-20T04:16:37+5:302017-01-20T04:16:37+5:30
मुंब्य्रात राजकीय शह देण्यासाठी सज्ज झालेल्या एमआयएमला फुटीचे ग्रहण लागले आहे.
कुमार बडदे,
मुंब्रा- मुंब्य्रात राजकीय शह देण्यासाठी सज्ज झालेल्या एमआयएमला फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यांचे काही माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामुळे त्याचा राजकीय फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.
एमआयएमसह अनेक राजकीय पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे पक्षीय अर्ज भरून घेण्यात गुंतले असून उमेदवारी देण्याचे निर्णय मात्र मुंब्य्राबाहेरील नेते घेणार असल्याची बाब समोर आली आहे. याच वेळी राष्ट्रवादीने मात्र मुंब्य्रातील सर्व २३ जागांवर विजय मिळवण्याचा चंग बांधला आहे. यासाठी सर्व विरोधी पक्षांवर मात करून नुकत्याच ठाण्यातील इतर प्रभागांप्रमाणेच मुंब्य्रातील प्रभागांमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
या वेळी मुंब्रा-कौशातील २३ प्रभागांसाठी एकूण १९२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. परंतु, ज्यांना तिकीट मिळणार नाही, त्यांचा पुढील वेळेस विचार करण्याचे आश्वासन पक्षाने दिल्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही, ते बंडखोरी करणार नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष शमीम खान यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे राष्ट्रवादीला मुंब्य्रात पर्याय ठरण्याची शक्यता असलेल्या एमआयएमला मात्र फुटीचे ग्रहण लागले आहे. त्या पक्षाचे काही माजी पदाधिकारी शुक्र वारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
>उमेदवार निवड हैदराबादला
भ्रष्टाचार तसेच इतर मुद्यांवर मुंब्य्रातील सर्व २३ प्रभागांमधून उमेदवार उभे करणाऱ्या एमआयएमच्या उमेदवारांची निवड हैदराबाद येथून येणारी निवड समिती पुढील काही दिवसांमध्ये करणार असल्याची माहिती मजहर लाला या स्थानिक अध्यक्षाने दिली.