वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या एमआयएमकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:48 AM2019-09-11T00:48:10+5:302019-09-11T00:51:19+5:30
जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले
पुणे - वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात पुणे वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्य मतदारसंघाचा समावेश आहे.
पुण्यातील वडगावशेरी शेरी मतदान संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेले डॅनियल लांडगे हे पुणे महापालिकेच्या एमआयएमच्या एकमेव नगरसेविका अश्विनी लांडगे यांचे पती आहेत.सध्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघतून भाजपचे जगदीश मुळीक प्रतिनिधित्व करतात. तर मालेगाव मध्य मतदार संघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक आणि नांदेड उत्तर मतदारसंघातून मोहम्मद फिरोज खान यांना उमेदवारी घोषित झाली आहे. सध्या काँग्रेसचे असिफ शेख तर नांदेड उत्तर मधून काँग्रेसचेच डी पी सावंत प्रतिनिधित्व करतात.
MIM declares candidates for three constituencies pic.twitter.com/7NFNc3M2dh
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) September 10, 2019
दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. त्यातच आता असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा युती तुटली असल्याचा खुलासा केला आहे. जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी वंचितमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले. एक प्रकारे ओवेसीनी आंबेडकर यांना धक्काच दिला. त्यानंतर लगेच इम्तियाज जलील यांच्याकडून पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.