‘एमआयएम’ची नजर प्रस्थापित पक्षांच्या नाराजांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 02:09 AM2017-01-20T02:09:40+5:302017-01-20T02:09:40+5:30
महापालिकेच्या रिंगणात प्रथमच उतरत असलेला एमआयएम दोन्ही कॉँग्रेस व समाजवादी पार्टीसाठी डोकेदुखी ठरणार
जमीर काझी,
मुंबई- मुंबई महापालिकेच्या रिंगणात प्रथमच उतरत असलेला एमआयएम दोन्ही कॉँग्रेस व समाजवादी पार्टीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. अद्याप उमेदवार जाहीर झालेले नसले तरी मुस्लीम व दलित बहुवस्ती असलेल्या सुमारे ७५ ते ८० प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. त्यासाठी मातब्बरांबरोबरच कॉँग्रेस, राष्ट्रवादी व सपाच्या नाराज इच्छुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.
भायखळा, नागपाडा, मालाड, वांद्रे, कुर्ला, गोवंडी, धारावी या वॉर्डवर एमआयएमने लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणच्या मुस्लीम व दलित समाजातील मातब्बरांना तिकीट दिले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार भायखळ्यातून विजयी झाला. तर वांद्रे पूर्व या मतदारसंघातून पक्षाने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे महापालिकेच्या रिंगणात त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. एमआयएममुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणार असल्याने भाजपा व शिवसेनेला ते फायद्याचे ठरणार आहे. तर काँग्रेस, समाजवादी व राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे. एमआयएमच्या उमेदवाराला जितकी मते मिळतील, तितका त्यांना तोटा होणार आहे.
‘एमआयएम’च्या प्रचाराची धुरा ओवेसी बंधूंवर असून त्यांनी आचारसंहितेपूर्वी मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या भागात दोन सभा घेऊन वातावरणनिर्मिती केली आहे. १९ फेबु्रवारीपर्यंत दोघा भावांच्या जवळपास ३० सभांचे नियोजन करण्यात आलेले आहे. एमआयएमचे मुंबई अध्यक्ष मतनी, भायखळ्यातील आमदार वारिस पठाण हे कॉँग्रेस, सपा व राष्ट्रवादीतील स्थानिक भागातील मातब्बर नेत्यांवर नजर ठेवून आहेत. त्यांना पक्षातर्फे उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर पार्टीत घेऊन तिकीट दिले जाणार आहे. प्रामुख्याने मुस्लिमांबरोबर काही दलित समाजातील उमेदवार देण्याचे पक्षाने ठरवले आहे.