एमआयएमला दिलासा, राज्य निवडणूक आयोगाने उठवली बंदी
By Admin | Published: August 9, 2016 07:39 PM2016-08-09T19:39:40+5:302016-08-09T19:39:40+5:30
एमआयएम आणि अंमळनेर विकास आघाडी या पक्षांवर राज्य निवडणूक आयोगाने घातलेली बंदी उठविण्यात आली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - प्राप्तिकर विवरणपत्र आणि लेखा परीक्षणाची प्रत सादर केल्यानंतर आता एमआयएम आणि अंमळनेर विकास आघाडी पक्षांवर राज्य निवडणूक आयोगाने घातलेली बंदी उठविण्यात आली. राजकीय पक्षांना नोंदणी आदेशानुसार प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याची आणि लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक असते.
कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे एकूण ३२६ राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात येऊन त्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दिलेल्या मुदतीत संबंधित पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यापैकी १९१ पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस . सहारिया यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये एमआयएमने मान्यता परत मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्याप्रमाणे त्यांना मान्यता परत मिळाली आहे. राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मान्यता परत मिळवल्यामुळे एमआयएमला निवडणूक लढवणं सहजसाध्य होणार आहे.