MIM खासदार इम्तियाज जलील यांची ऑफर; राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपेंची सावध भूमिका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:13 PM2022-03-19T16:13:18+5:302022-03-19T16:13:43+5:30
आता असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. भाजपाविरोधी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देत राज्यात सत्ता मिळवली. परंतु आता असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर दिली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(MIM Imtiaz Jalil) यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांच्यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यंत(NCP Sharad Pawar)) निरोप पोहोचवा अशी विनंती केली. परंतु यावर राजेश टोपे यांनी सावध भूमिका घेत पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेतील असं म्हटलंय.
"जे काही एमआयएमला बोलायचं असेल ते त्यांनी पक्षश्रेष्ठींशी बोलावं. ते जे निर्णय घेतील ते सर्वांना मान्य असेल. आमच्या अल्पसंख्यांकांची काळजी घेणारा कोणताही पक्ष असेल त्यांना आम्ही साथ देऊ असं जलिल म्हणाले. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं," असं राजेश टोपे म्हणाले. त्या सामान्य गप्पा होत्या. उत्तर प्रदेशबाबतही आम्ही गप्पा केल्या. उत्तर प्रदेशात एमआयएममुळे काही १०-१५ जागांवर पराभव झाला असा आमचा अभ्यास आहे. अन्यथा १०-१५ जागा वाढल्या असता. जातीयवादी पक्षांना मदत होईल असं का वागता, काय धोरणं आहे असं त्यांना विचारलं," असंही त्यांनी सांगितलं.
आमचं म्हणणं काही नाही. अल्पसंख्यांक समाजाचा विकास व्हावा ही आमची धारणा आहे. आमचा प्रश्न सोडवणार पक्ष असेल त्यांच्यासोबत आम्ही कधीही येऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं. जे काही तुमचं म्हणणं आहे ते महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला बोला असं त्यांना सांगितल्याचंही टोपेंनी नमूद केलं. गप्पांमधील हे विषय आहेत. ज्या काही गोष्टी असतात ते पक्षश्रेष्ठी ठरवतात. आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला तो अधिकार नसतो. आमच्या अनौपचारिक चर्चा होत्या. मला याबाबत बोलण्याचा अधिकार नसल्याचंही ते म्हणाले.