महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?; खा. इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 07:43 AM2021-12-11T07:43:33+5:302021-12-11T08:13:56+5:30
५ टक्के मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमनं आवाज उचलला आहे. त्यात सर्वपक्षीय मुस्लिमांनी सहभागी व्हावं. हा राजकीय मुद्दा नाही तर मुस्लीम समाजाचा मुद्दा आहे असंही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
औरंगाबाद – मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करत एमआयएमची तिरंगा यात्रा मुंबईसाठी रवाना झाली आहे. पोलिसांचा दबाव आणून AIMIM ची रॅली अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदान बुक करायला गेलो तिथं शिवसेना आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जाऊन आयोजकांना धमकी देत कार्यक्रम रद्द करायला भाग पाडायचे. आमच्यावर अनेक निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला. मात्र चांदिवली येथील शाळेत सभेला परवानगी मिळाली आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सभा घेतील अशी माहिती औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
शनिवारी सकाळी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईसाठी रवाना झाली. यावेळी इम्तियाज जलील(MP Imtiyaj Jalil) म्हणाले की, मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका असा आदेश पोलिसांनी दिला. हा आमच्या पक्षाचा झेंडा नाही. आमच्या स्वाभिमानाचा हा झेंडा आहे. महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का? आम्ही सरकारला प्रश्न विचारायला जातोय. मुस्लीम आरक्षणाबाबत काय करताय? वक्फ बोर्डाची ९३ हजार एकर जमिनी कोणी लाटल्या? सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या जमिनी हडप केल्यात. हे प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय. भाजपा-शिवसेना काळात काँग्रेस-राष्ट्रवादी मुस्लीम आरक्षणावर इतकं भांडत होते. मुस्लिमांना आरक्षण का देत नाही असं काँग्रेस-राष्ट्रवादीवाले विचारत होते. मात्र आता हे सत्तेत आहेत त्यावर काहीच बोलायला तयार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच हा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. मुस्लीम समाजावर अन्याय झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांसह इतर पक्षातील सगळ्या मुस्लीम नेत्यांनाही निमंत्रण पाठवलं आहे. ५ टक्के मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमनं आवाज उचलला आहे. त्यात सर्वपक्षीय मुस्लिमांनी सहभागी व्हावं. हा राजकीय मुद्दा नाही तर मुस्लीम समाजाचा मुद्दा आहे असंही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
राज्यभरातून MIM कार्यकर्ते मुंबईत धडकणार
मुस्लीम आरक्षण( Muslim Reservation) आणि वक्फ बोर्डच्या प्रश्नावर एमआयएमची ( MIM ) तिरंगा यात्रा शनिवारी मुंबईत धडकणार आहे. या रॅलीत प्रत्येक वाहनावर तिरंगा असेल, शनिवारी पहाटे औरंगाबाद येथून अहमदनगर, पुणे मार्गे सर्वजण मुंबईला पोहचतील, तर राज्यातील अनेक जिल्ह्यातून वाहने थेट मुंबईत येतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaj Jalil ) यांनी दिली आहे.