‘एमआयएम’चे ‘टार्गेट’ संघभूमी

By admin | Published: February 4, 2015 12:55 AM2015-02-04T00:55:57+5:302015-02-04T00:55:57+5:30

विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे दोन जागांवर विजय मिळविणाऱ्या ‘एमआयएम’ने (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलिमिन) राज्यात संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

'MIM' target 'Sanghbhoomi' | ‘एमआयएम’चे ‘टार्गेट’ संघभूमी

‘एमआयएम’चे ‘टार्गेट’ संघभूमी

Next

असदुद्दीन ओवैसींच्या सभेची तयारी : पोलीस परवानगी देणार का?
नागपूर : विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे दोन जागांवर विजय मिळविणाऱ्या ‘एमआयएम’ने (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलिमिन) राज्यात संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात ‘एमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा घेण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. पुणे येथील सभेला कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता ओवेसी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. नागपुरातदेखील त्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून त्यांना सभेसाठी परवानगी देण्यात येणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
ओवेसी यांच्या अनेक सभा वादग्रस्त ठरल्या आहेत. आपल्या जहाल भाषणातून टीकेचे आसूड ओढणाऱ्या ओवैसी यांना हिंदुत्ववादी संघटनांचा नेहमीच विरोध राहीला आहे. अशा स्थितीत संघाच्या गृहनगरातच त्यांची सभा आयोजित करण्याचा ‘एमआयएम’चा प्रयत्न सुरू आहे. येत्या २८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानात सभा आयोजित करण्याची परवानगी ‘एमआयएम’कडून मागण्यात आली आहे. या सभेमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याचा धोका आहे. यातूनच पुणे येथील सभेला परवानगी नाकारण्यात आली. आता नागपुरातदेखील ओवैसी यांची सभा होईल की नाही याचा निर्णय पोलीस प्रशासनावरच अवलंबून आहे.
दरम्यान, सभेअगोदर ओवैसी उपराजधानीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. शिवाय पुढील रणनीतीबाबत चर्चादेखील करतील. जर प्रशासनाने परवानगी नाकारली तर काही कायदेशीर आधार घ्यायचा का याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे ‘एमआयएम’चे प्रवक्ते शकील पटेल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
राजकारण तापण्याची शक्यता
ओवैसी यांच्या भाषणात धार्मिक तेढ निर्माण होणारे मुद्दे असतात असे आरोप वारंवार निरनिराळ््या संघटनांकडून लावण्यात आले आहेत. अशा स्थितीत जर सभेला परवानगी मिळाली तर निश्चितच नागपुरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधव आहेत. अशा स्थितीत यांना एकत्रित ‘व्होटबँक’ बनविण्यासाठी ‘एमआयएम’कडून प्रयत्न करण्यात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात नागपुरात ‘एमआयएम’चे कार्यालय सुरू झाले होते.

Web Title: 'MIM' target 'Sanghbhoomi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.