...तर एमआयएम महापालिका निवडणुका लढणार नाही; खा. जलील यांची ठाकरे सरकारला ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 04:47 PM2021-12-13T16:47:06+5:302021-12-13T16:48:08+5:30
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमची आक्रमक भूमिका; राज्य सरकारला थेट आव्हान
औरंगाबाद: मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या एमआयएमनं राज्य सरकारला मोठी ऑफर दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे सरकारनं मुस्लिम आरक्षणाची घोषणा करावी. तशी घोषणा केल्यास एमआयएम महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार नाही, अशी घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये आयोजिकत पत्रकार परिषदेत जलील यांनी ही घोषणा केली.
महापालिका निवडणुका आल्यानं एमआयएमनं मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. त्यावर बोलताना जलील यांनी राज्य सरकारला मोठी ऑफर दिली. निवडणुका जवळ आल्यानं एमआयएमनं आरक्षणाचा विषय हाती घेतल्याचं सरकार म्हणतं. त्यामुळे आम्ही सरकारला आव्हान देतो की त्यांनी मुस्लिम आरक्षण द्यावं. तसं झाल्यास आम्ही पुढील महापालिका निवडणुका लढवणार नाही, असं जलील म्हणाले.
सरकारनं मुस्लिम आरक्षणाची घोषणा न केल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात आम्ही विधान भवनावर धरणं आंदोलन करू, असा इशारा जलील यांनी दिला. आता सरकार याबद्दल काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या एमआयएमनं शनिवारी औरंगाबाद ते मुंबई अशी तिरंगा यात्रा काढली होती.