राज्यात १० ठिकाणी होणार खनिज सर्वेक्षण
By Admin | Published: May 11, 2016 07:19 PM2016-05-11T19:19:55+5:302016-05-11T19:19:55+5:30
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे २०१६-१७ मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण १० योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11- भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे २०१६-१७ मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण १० योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक, चंद्रपूर जिल्हा लोह खनिजासाठी, अहमदनगर, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील सामान्य सर्वेक्षण योजनांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची ५२ वी बैठक नागपूर येथे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व केंद्र शासनाच्या भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभाग व इतर यंत्रणेद्वारे कार्यसत्र २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र राज्यात केलेल्या भूवैज्ञानीय सर्वेक्षण व खनिज समन्वेषण कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच २०१६-१७ मध्ये संबंधित विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भूवैज्ञानीय कार्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाने खाणी व पूर्वेक्षणाच्या कामास प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी खाण व खनिजे (विकसन व नियमन) अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने झालेल्या सुधारणांची माहिती देण्यात आली. खाण ब्लॉक लिलाव प्रक्रियेच्या परिस्थितीत बदल करून, अनुकूल बनवून उद्योजकांचा संभ्रम दूर केला. शासन खाण व पूर्वेक्षण कार्यास गती प्रदान करून जास्तीत जास्त खनिज क्षेत्रे लिलावाकरिता उपलब्ध करण्यासाठी कार्यरत आहे. या कामासाठी त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विभागाद्वारे केलेल्या पूर्वेक्षणाच्या कामाची प्रशंसा करून जास्तीत जास्त खनिज क्षेत्रे अल्प कालावधीत लिलावासाठी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.