CoronaVirus Lockdown News: मिनी लॉकडाऊनचा बसतो फटका; बाजारपेठेतील खरेदी- विक्रीच पूर्णपणे थांबते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 02:49 AM2021-04-09T02:49:31+5:302021-04-09T07:20:40+5:30
अनेक आर्थिक गणिते अवलंबून असल्याने महाराष्ट्रातील या ‘मिनी लॉकडाऊन’ची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाही पोहोचत आहे
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम अमलात आणली आहे. त्याअंतर्गत अनेक निर्बंध लोकांवर लादण्यात आले आहेत. परंतु या निर्बंधांविरोधात व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला. अनेकांनी या ‘मिनी लॉकडाऊन’ला विरोध दर्शवला. हळूहळू विरोधाचा हा सूर विस्तारत चालला आहे. अनेक आर्थिक गणिते अवलंबून असल्याने महाराष्ट्रातील या ‘मिनी लॉकडाऊन’ची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाही पोहोचत आहे. कसे ते पाहू या...
रिटेल क्षेत्रात महाराष्ट्रात ५० लाखांहून अधिक लोक काम करतात तर १२ लाखांहून रिटेल आऊटलेट्स महाराष्ट्रात आहेत. मिनी लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. कोरोनाची चेन रोखणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पण रोजगाराची साखळी ब्रेक होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील मिनी लॉकडाऊनचा थेट परिणाम सर्व क्षेत्रांवर होणार असून देशाची अर्थव्यवस्था घसरणीला लागण्याची भीती आहे.
मुंबई आणि पुणे या दोन शहरांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे ही दोन्ही शहरे रिअल इस्टेट क्षेत्रात देशात अव्वल स्थानावर आहेत.
नाशिक, नागपूर, ठाणे आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचेही औद्योगिक स्थान कोरोनामुळे धोक्यात आले आहे.
सणावारांनाही फटका
महाराष्ट्रात लागू झालेल्या ‘मिनी लॉकडाऊन’च्या काळात गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण आलेला आहे.
गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे.
मात्र, कठोर निर्बंधांमुळे या सगळ्याचा परिणाम वाहनविक्रीवर होण्याचा संभव आहे.
एप्रिल महिन्यात घाऊक विक्रेत्यांना सुमारे ५ अब्ज रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचा कयास आहे.