लाच घेतल्याप्रकरणी खणीकर्म अधिकारी, ठेकेदारास अटक

By admin | Published: May 3, 2017 01:32 AM2017-05-03T01:32:11+5:302017-05-03T01:32:11+5:30

कार्यालय सुटण्याची वेळ अन् ‘ट्रॅप’ची कारवाई

Miniclaw officer, contractor arrested for bribe | लाच घेतल्याप्रकरणी खणीकर्म अधिकारी, ठेकेदारास अटक

लाच घेतल्याप्रकरणी खणीकर्म अधिकारी, ठेकेदारास अटक

Next

कोल्हापूर : खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील पाझर तलाव नूतनीकरणाच्या खर्चाच्या बिलांची रक्कम मंजुरीसाठी बांधकाम ठेकेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच मध्यस्थी ठेकेदाराकडून स्वीकारल्याप्रकरणी खणीकर्म अधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक केली.
संशयित अभय सुरेश भोगे (वय ४४, रा. महावीर गार्डनच्या मागे, नागाळा पार्क, मूळ रा. नागपूर), ठेकेदार पोपट गणपती मोहिते (४६, रा. घुणकी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई केल्याने प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार हे खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील बांधकाम ठेकेदार आहेत. जिल्हा परिषदेच्या आखत्यारित असणाऱ्या खनिज विकास निधी अंतर्गत खुटाळवाडी येथील पाझर तलाव नूतनीकरणाच्या कामाचे टेंडर निघाले होते. त्यांनी २०१६ मध्ये मागणी केलेली निविदा मित्राच्या नावे आॅनलाईन भरली होती. त्याप्रमाणे १३ जानेवारी २०१६ ला निविदा मंजूर झाली. त्यांनी मित्राच्या नावे मिळालेली वर्कआॅर्डर घेऊन त्याचे संमतीपत्र घेऊन काम सुरू केले. त्यासाठी स्वत:जवळच्या पैशातून दि. १४ जुलै २०१६ ला काम पूर्ण केले. या कामाचे अंतिम बिल मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील खणीकर्म विभागाकडे पाठविले होते. या बिलाची रक्कम मंजूर होण्यासाठी नागपूर खणीकर्म विभागाकडे पाठवायचे होते. त्यासाठी खणीकर्म अधिकारी अभय भोगे यांनी तक्रारदारांकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी भोगे यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे दि. २८ एप्रिल २०१७ ला तक्रार केली.
पोलीस उपअधीक्षक राजेश गवळी यांनी तक्रारदाराच्या अर्जानुसार दि. २९ एप्रिलला शासकीय पंच, साक्षीदारांच्या समक्ष खणीकर्म कार्यालयात भोगे यांनी लाचेची मागणी केल्याची खात्री केली. त्यानंतर नियोजनाप्रमाणे मंगळवारी कारवाईची तयारी केली. तक्रारदाराने भोगे यांना फोन करूा पैसे घेऊन येत असल्याचे सांगितले. त्यानुसार ते सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले. आजूबाजूला लाचलुचपत विभागाचे अधिकारी व कर्मचारी थांबून होते. तक्रारदार भोगे याच्यासमोर गेल्यावर त्याने पोपट मोहिते याला बाहेर जाऊन पैसे घेण्यास सांगितले. मोहिते हा त्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील महिला विश्रांती कक्षाच्या लिफ्टसमोर आला. याठिकाणी पैसे घेऊन खिशात ठेवत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. तेथून थेट पोलीस खणीकर्म कार्यालयात आले. भोगे समोरच्या काही ठेकेदारांशी चर्चा करीत होते. त्यांच्या समोरच पोलिसांनी त्यांना ‘चला उठा, तुमचा डाव फसलाय’ असे म्हणून त्यांना हाताला धरून पोलीस गाडीत बसविले. भोगेला लाचप्रकरणी अटक झाल्याचे वृत्त समजताच प्रशासनात खळबळ उडाली. त्याच्यासह ठेकेदार मोहिते याला थेट शनिवार पेठेतील कार्यालयात आणले. याठिकाणी त्याच्याकडे चौकशी सुरू असताना भोगे याला अश्रू अनावर झाले. रात्री उशिरा या दोघांची करवीर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)
—————————————
घराची झडती
अभय भोगे याच्या नागाळा पार्क येथील घराची पोलिसांनी रात्री झडती घेतली. त्याच्या बँक खात्यासह काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रके हस्तगत केली. भोगे याचा नागपूर येथे आलिशान बंगला आहे. त्याचीही माहिती पोलिसांनी घेतली.


वरिष्ठांच्या नावाखाली पैशांची मागणी
कोल्हापूर जिल्ह्णात ५०० वाळू ठेकेदार आहेत. यावर्षी ७० टेंडरना मंजुरी मिळाली आहे. आॅनलाईन टेंडर भरण्यापासून ते मंजुरी व बिलाची रक्कम मिळण्यासाठी एका ठेकेदाराला किमान दोन लाख रुपये सोडावे लागतात. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ठेकेदाराकडून भोगे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिपाई यांची नावे सांगून पैसे घेत असल्याच्या तक्रारी काही ठेकेदारांनी प्रत्यक्ष लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात येऊन केल्या.


पोपटराव, ते घ्याओ...
पोपटराव सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले. खनिकर्म विभागात ते गेले. वाळू उपसाबंदी केल्यामुळे भरलेली ठेव परत मिळावी म्हणून ते लेखी अर्ज घेऊन आले होते. या विभागातील अधिकाऱ्यांकडे अर्ज देण्यापूर्वीच या कार्यालयात लाचलुचपत विभागाने जाळे रचले होते. कार्यालयात गर्दी होतीच. कार्यालय सुटण्याची वेळ होत आल्याने प्रत्येकाची लगबग सुरू होती. त्यातच फिर्यादी साहेबांकडे पैसे देत होता. त्यावेळी साहेबांनी पोपटरावांकडे बोट दाखवून इशारा केला. ‘पोपटराव, ते घ्याओ’ असा साहेबांचा वजनदार आवाज पडताच गोंधळलेल्या पोपटरावांनी ते पैसे स्वीकारले अन् ‘ट्रॅप’ सफल झाला.


कार्यालय सुटण्याची वेळ अन् ‘ट्रॅप’ची कारवाई
कार्यालय सुटण्याची वेळ नजीक आली; त्यामुळे कर्मचाऱ्यांची बाहेर पडण्यासाठी लगबग सुरू झाली. सायंकाळी पाच वाजता कार्यालय गजबजले असतानाच अचानक कार्यालयात गोंधळ उडाला. खनिकर्म विभागाच्या कक्षाचे दरवाजे व खिडक्या धडाधड बंद झाल्या. खिडक्यांचे पडदे आतून बंद करण्यात आले. दारे-खिडक्यांच्या बंद होण्याच्या आवाजाने कक्षाच्या परिसरातील काहींनी लाखोल्या वाहिल्या; पण अवघ्या १५ मिनिटांतच आत काय प्रकार घडला, याची चर्चा कक्षाबाहेर सुरू झाली. सुमारे अर्ध्या तासात बंद खोलीतील चर्चेनंतर पुन्हा दरवाजे उघडले गेले. तसेच अभय भोगे हे साध्या गणवेशातील पोलिसांसोबत निस्तेज चेहऱ्याने बाहेर पडले. त्यानंतर चर्चेचे रूपांतर सत्यात झाले. भोगेपाठोपाठ पोपटराव हे दुसरे संशयितही त्यांच्यामागे पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर आले. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती.

Web Title: Miniclaw officer, contractor arrested for bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.