शेकोटी पेटवा, थंडी लागणार; महाराष्ट्रातील किमान तापमान तीन अंशांनी घटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 07:50 AM2021-12-05T07:50:35+5:302021-12-05T07:50:49+5:30
संपूर्ण कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रात किमान तापमानात दोन - तीन अंशांनी घट होऊन थंडी वाढेल
मुंबई : मुंबईसह राज्यभरात हवामानात बदल झाले असून, आता कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली आहे. राज्यभरातील हवामान कोरडे होत असतानाच आता पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रात किमान तापमानात दोन - तीन अंशांची घट होऊन थंडी वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून पाऊस उर्वरित महाराष्ट्रात पूर्णपणे उघडीप घेईल. संपूर्ण कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रात किमान तापमानात दोन - तीन अंशांनी घट होऊन थंडी वाढेल. उत्तर भारतात ५ व ६ डिसेंबर असे दोन दिवस काश्मीर, हिमाचल, लडाख, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली येथे मोठ्या स्वरूपाचा पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळेच महाराष्ट्रात थंडी जाणवेल.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान मालेगाव आणि वाशिम येथे १४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.