मंत्री अनिल परब यांची ईडीऐवजी शिर्डीत हजेरी, म्हणाले...सोमय्यांना उत्तर देण्यास बांधील नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:26 AM2022-06-16T06:26:27+5:302022-06-16T06:26:44+5:30
ईडी प्रशासन जे प्रश्न विचारील, त्याची उत्तरं देण्यास मी बांधील आहे.
शिर्डी :
ईडी प्रशासन जे प्रश्न विचारील, त्याची उत्तरं देण्यास मी बांधील आहे. किरीट सोमय्या यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. ज्या एजन्सीला अधिकार आहेत, त्यांना उत्तरं देत आलोय. यापूर्वी उत्तरे दिलीत, पुढेही देत राहीन, अशा शब्दांत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांच्यावरील आपला रोष व्यक्त केला.
मंत्री परब यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी बुधवारी हजर राहण्याचे समन्स होते. मात्र, त्यांनी ईडीच्या कार्यालयाऐवजी शिर्डी गाठून साईदर्शन घेतले. ईडीची नोटीस मंगळवारीच मिळाली. पण, मी मुंबईबाहेर असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकलो नाही. यापूर्वीही दोनदा चौकशीला सामोरा गेलो आहे. मुंबईत गेल्यानंतर मात्र ईडीच्या कार्यालयात जाईन. तशी कल्पना ईडी कार्यालयाला दिली आहे. नाशिकला आलो होतो. त्यामुळे शिर्डीला साईदर्शनाला आलो असल्याचे परब यांनी माध्यमांना सांगितले.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी साईदरबारी हजेरी लावत माध्यान्ह आरतीचा लाभ घेतला. या वेळी संस्थानचे विश्वस्त सचिन कोते, उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, विजय जगताप, अमृत गायके आणि अमोल गायके यांच्यासह अन्य उपस्थित होते.