‘लव्ह जिहाद’मुळे लग्न मोडलं, जोडप्याच्या मदतीसाठी बच्चू कडू सरसावले; विरोध करणाऱ्यांना सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:59 PM2021-07-16T18:59:08+5:302021-07-16T19:00:46+5:30

सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला आहे.

Minister Bacchu Kadu Supports those couple who marriage stop due to ‘Love Jihad’ issue Nashik | ‘लव्ह जिहाद’मुळे लग्न मोडलं, जोडप्याच्या मदतीसाठी बच्चू कडू सरसावले; विरोध करणाऱ्यांना सज्जड दम

‘लव्ह जिहाद’मुळे लग्न मोडलं, जोडप्याच्या मदतीसाठी बच्चू कडू सरसावले; विरोध करणाऱ्यांना सज्जड दम

googlenewsNext
ठळक मुद्दे धर्म न बदलता विवाह करत असतील तर इतरांनी लुडबूड का करायची? ही काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीला जातीधर्माचे वळण लावले जाते नाशिक शहरातील एका हिंदू समाजाच्या दिव्यांग मुलीसोबत मुस्लीम युवकाने स्वखुशीने विवाह करण्याचा निर्णय घेतला.

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेत असणाऱ्या आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू नाशिक येथे पोहचले. हा लव्ह जिहाद नसून या दोघांचा विवाह सोहळा पार पडणारच असं बच्चू कडूंनी ठणकावून सांगितले आहे. दोन्ही कुटुंबीयांची संमती असताना इतरांनी यात लुडबूड करू नये अशी खरडपट्टी बच्चू कडूंनी लग्नाला विरोध करणाऱ्यांची काढली आहे.

सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला आहे. या विवाहाला काही लोकांनी विरोध केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी दोन्ही कुटुंबीयांना पाठिंबा दिला आहे. धर्म न बदलता विवाह करत असतील तर इतरांनी लुडबूड का करायची? ही काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीला जातीधर्माचे वळण लावले जाते असं बच्चू कडू म्हणाले. तसेच रसिकाच्या लग्नात मी उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

नाशिक शहरातील एका हिंदू समाजाच्या दिव्यांग मुलीसोबत मुस्लीम युवकाने स्वखुशीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वधु-वरांच्या उभय पक्षांना मान्य असल्याने लग्नपत्रिकाही तयार करण्यात आली. मात्र ही लग्नपत्रिका सोशल मीडियावरुन काही कट्टरवादी धर्मांध संघटनांनी व्हायरल करत प्रचंड दबाव वाढविला. यामुळे वधुपक्षाकडे समाजाच्या संघटनेकडूनही विचारणा झाली. अखेर वधुपित्याने लेखी देत हा विवाह रद्द करत असल्याचे संघटनेला कळविले आणि दोन्ही कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडले.

नाशिकमध्ये हिंदू समाजातील एका दिव्यांग मुलीसोबत शिकणाऱ्या मुस्लीम युवकाने लग्नासाठी स्वखुशीने तयारी दर्शविली. या तरुण-तरुणीचे कुटुंबदेखील एकमेकांच्या जुने परिचित आहेत. तरुणी दिव्यांग असल्याने तिला लग्नासाठी स्थळं येत नव्हती. तिच्यासोबत शिकणारा मुस्लीम युवक हे सर्व जाणून होता. त्याच्या संवेदनशील मनाने ही बाब हेरली आणि त्याने लग्नाचा मानस तरुणीच्या वडिलांकडे बोलून दाखविला. दोन्ही कुटुंबातील वडिलधारे एकत्र आले. त्यांची बैठक झाली आणि कोरोनाची साथ लक्षात घेता शासकीय नियमानुसार मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत शहरातील चांडकसर्कल परिसरातील एका हॉटेलमध्ये लग्नसोहळा करण्याचे ठरले. जवळच्या पाहुण्यांना लग्नपत्रिका सोशल मिडियाच्या माध्यमातून पाठविण्यात आली. दरम्यान, ही लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली अन‌् त्यावर लक्ष गेले काही धर्मांध कट्टरवादी संघटनांचे. एका समाजाच्या काही संघटनांनी या लग्नाला विरोध दर्शविला. दरम्यान, वधु किंवा वर पक्षाकडून यासंदर्भात कोणाविरुद्धही पोलीस किंवा अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे अद्यापतरी तक्रार केलेली नाही.

लव्ह जिहादचा दिला रंग

वस्तुस्थिती समजून न घेता ‘लव्ह जिहाद’चा रंग देत राळ उठवली. परिणामी वधुपक्षाला त्यांच्या समाजाच्या संघटनेनेही विचारणा केली. दरम्यान, या दोन्ही कुटुंबियांचा लग्नाचा आनंद बाजूला पडला आणि मानसिक ताण-तणावाला त्यांना सामोरे जावे लागले. अखेर आपआपसांत त्यांनी चर्चा करत लग्नसोहळा रद्द करण्यात येत असल्याचा लेखी ‘निर्वाळा’ समाजाच्या संघटनेच्या अध्यक्षांकडे दिला.

Web Title: Minister Bacchu Kadu Supports those couple who marriage stop due to ‘Love Jihad’ issue Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.