जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:32 PM2023-11-17T16:32:18+5:302023-11-17T16:34:18+5:30

याद राख, तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा इशारा भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. 

Minister Chhagan Bhujbal criticized Manoj Jarange Patil's agitation from the OBC sabha | जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

जालना- पोलीस जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले तेव्हा आधीच तयारी केली होती. पोलिसांनी तुमची तब्येत ढासळतेय असं विनंती करायला गेले तेव्हा दगडांचा मारा सुरू केला. ७० पोलीस पाय घसरून पडले का?  पोलिसांना कुणी मारले, महिला पोलिसांच्या घरी जा, तुम्हाला पत्ते देतो, त्यांच्यावर काय झाले हे वदवून घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सूनेलाही मानाने परत पाठवले, पण तुम्ही महिला पोलिसांवर काय केले, हे सगळे झाल्यावर लाठीचार्ज केला असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 

जालनातील अंबड इथं ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी हे विधान केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, पोलिसांची बाजू आलीच नाही, पोलिसांवर हल्ला झाला, महिला पोलीस जखमी झाल्या. एकच बाजू लोकांसमोर आणली जाते. लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन बसले, यांना अंबडचे आमचे मित्र राजेश टोपे, रोहित पवार यांनी त्यांना रात्री ३ वाजता घरातून घेऊन आले. शरद पवार येणार आहेत. पोलिसांवर लाठीचार्ज का झाला हे पवारांना सांगितले नाही. जर पवारांना हे माहिती असते तर आज वेगळे चित्र असते. मी फडणवीसांना विचारले, तुमच्याकडे सगळी माहिती आहे. तुम्ही सांगायला हवे होते, माझ्या पोलिसांवर हल्ला झाला मी सहन करू शकत नाही. राज्यापुढे आणि देशापुढे हे चित्र आले नाही. उलट पोलीस निलंबित, गृहमंत्री माफी मागायला लागले. गुन्हे मागे घेतो, हिंमत वाढली. किती लांगुनचालन करायचे? असा सवाल त्यांनी विचारला. 

त्याचसोबत बीडमध्ये प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला केला. पहिला दरवाजा तोडला, ऑफिस, गाड्या जाळल्या, सगळीकडे पेट्रॉल बॉम्ब, कोयते तयार होते, २००-४०० लोक गेली, दुसरा दरवाजा तोडला, तिथेही हल्ला झाला. एकच ग्रुप नव्हता तर अनेक ग्रुप होते, कोड नंबर देण्यात आले होते. सुभाष राऊतचे हॉटेल जाळण्यात आले, फरशाही उखडून टाकल्या, राखरांगोळी म्हणजे काय असते ते मी त्यादिवशी पाहिली. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर त्यांचेही ऑफिस, कार्यालय जाळून टाकले. आमचे मंत्री, माजी न्यायमूर्ती त्याला उठा, उठा म्हणायला गेले, याद राख, तू माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असा इशारा भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला. 

दरम्यान, क्षीरसागर यांच्या घरी पेट्रॉल बॉम्ब फेकले, घरात महिला, लहान मुले होती, गाड्या पेटल्या, आगीचे धूर झाले, खुर्च्यांवर उभ्या राहून लेकरांना पाय धरून महिलांनी भिंतीपलीकडे सुखरुप पाठवले, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला स्वकीयांची घरे जाळायला सांगितले? स्वतच्या आयाबहिणींना पेटवायला सांगितले. कोण करणार या घटनांची चौकशी, महाराष्ट्रात जातीय जनगणना झालीच पाहिजे, सगळेच मागणी करतायेत. मग अडचण कुठे, दूध का दूध, पानी का पानी हो जायेगा, जनगणना करा, आम्ही किती आहोत ते दाखवा. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मेळावे झाले पाहिजे. आता ही ज्योत तालुक्यातालुक्यात पेटली पाहिजे असं आवाहन भुजबळांनी ओबीसींना केले. 

Web Title: Minister Chhagan Bhujbal criticized Manoj Jarange Patil's agitation from the OBC sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.