जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:28 PM2024-05-30T12:28:51+5:302024-05-30T12:32:25+5:30

जितेंद्र आव्हाडांकडून महाडच्या चवदार तळ्याजवळ आंदोलन करताना बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेची झोड उठली. त्यातच मंत्री भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे. 

Minister Chhagan Bhujbal supported Jitendra Awhad over controversy on Dr Babasaheb Ambedkar Poster | जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर

जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला छगन भुजबळ सरसावले; सत्ताधाऱ्यांनाच दिला घरचा आहेर

नाशिक - Chhagan Bhujbal on Jitendra Awhad ( Marathi News ) महाडच्या चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाडांकडूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आला. आव्हाडांच्या या कृतीविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनावधानाने हे पोस्टर फाडले गेले, मात्र मी माफी मागतो असं आव्हाडांनी म्हटलं. मात्र सत्ताधारी भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीकडून आव्हाडांचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ हे जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला सरसावले आहेत. 

छगन भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने महाडला गेले. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना चांगली होती. त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. त्यावेळी त्यांनी न बघताच ते चित्र फाडलं. आव्हाडांनंतर त्यांचे अनुकरण इतरांनी केले. पण त्यांनी माफीही मागितली. मूळ मुद्दा जो आहे आम्हाला मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको हे बाजूला होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड असंच सुरू राहिलं असं त्यांनी म्हटलं. 

तसेच अचानक अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचं कारण काय? २ श्लोक असले म्हणून काय, पण चंचू प्रवेश पाहिजेच कशाला? संत ज्ञानेश्वर, संत तुकारामाचे श्लोक तुमच्याकडे नाहीत का? अनेक संताचे आहेत. जी गोष्ट लोकांना नको त्याचा चंचू प्रवेश का करायचा. यापाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे. त्यात दुर्दैव असे की बहुजन समाजाचे मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर हे त्याची भलामण करतात याचे मला दु:ख वाटतं असं सांगत मंत्री छगन भुजबळांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी मानले भुजबळांचे आभार

अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर , आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले छगन भुजबळ असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

त्याचसोबत आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने मी आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे असं सांगत आव्हाडांनी भुजबळांचे आभार मानले. 

Web Title: Minister Chhagan Bhujbal supported Jitendra Awhad over controversy on Dr Babasaheb Ambedkar Poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.