ॲड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेने घातली गळ; पक्षात येण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
By सुनील पाटील | Published: July 12, 2021 09:14 AM2021-07-12T09:14:09+5:302021-07-12T09:16:05+5:30
यापूर्वी शरद पवार यांनीदेखील दोन वेळा निकम यांना दिली होती राज्यसभेची ऑफर. निकम यांनी पवार यांची ऑफर नाकारली होती.
सुनील पाटील
जळगाव : राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी शिवसेनेकडून त्यांना गळ घालण्यात आली असून, जळगाव दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ॲड. निकम यांची घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सरकारी दौऱ्यातही त्याचा उल्लेख नव्हता. गेल्या महिन्यात खा. संजय राऊत यांनीही ॲड. निकम यांची भेट घेतली होती.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ॲड. निकम यांना दोनवेळा राज्यसभेची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिला होता. आता राज्यसभेत शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्याचा पहिला प्रस्ताव आहे. त्याशिवाय चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास तो खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पर्याय खुला आहे.
राजकारण प्रवेशाचा अजून तरी विचार केलेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत बंदद्वार चर्चा झाली; मात्र त्याचा तपशील सांगता येणार नाही. याआधीदेखील शरद पवार यांनी प्रस्ताव ठेवला होता, मात्र तेव्हाही आपण नकार दिला होता. खासदार संजय राऊत यांनीही गेल्या महिन्यात सदिच्छा भेट घेतली होती. सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात.
उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील