मंत्री गिरीश महाजन बचावले
By admin | Published: January 30, 2017 12:29 AM2017-01-30T00:29:06+5:302017-01-30T00:29:06+5:30
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका अपघातातून स्वत: महाजन यांच्यासह चार जण बालंबाल बचावले.
जामनेर (जि. जळगाव) : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका अपघातातून स्वत: महाजन यांच्यासह चार जण बालंबाल बचावले.
भाजपा कार्यकर्ता कैलास कुमावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी गिरीश महाजन हे आपल्या वाहनाने (क्र.एम.एच.१९ सीएल ०९०९ ) जामनेरकडे येत असताना पळासखेडा बुद्रूकनजीक वाहनाचे मागील टायर फुटले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणार, तेवढ्यात क्षणाचाही विलंब न लावता महाजन यांनी चालकाला वाहन थांबविण्याची सूचना केली. समोरील झाडावर वाहन आदळण्याआधीच चालक वाहन थांबविण्यात यशस्वी झाल्याने त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वाहनात महाजन यांच्यासोबत स्वीय सहायक संतोष बारी, पोलीस सुरक्षा रक्षक नितीन मोरे, चालक जितेंद्र नेमाडे असे एकूण चार जण होते. कार्यकर्त्यांच्या सदिच्छा सोबत असल्याने कुणालाही थोडेही खरचटलेसुद्धा नाही, असे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)