निवडणूक हरलो, जिंकलो तरी...; मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 02:37 PM2022-11-01T14:37:07+5:302022-11-01T14:37:41+5:30
आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत.
जळगाव - आमच्यावर बोलण्यासाठी काही लोकं सोडलेत, जा त्यांना बदनाम करा. कुणी कितीही आमच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत असाल तरी ३० वर्ष शिवसेना संघटना वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. निवडणूक हरलो, जिंकलो तरी खांद्यावरचा भगवा खाली उतरवला नाही. परंतु आता ३-४ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले लोकं आमच्यावर टीका करतायेत. आम्ही मंत्रिपद सोडून गुवाहाटीला गेलो. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे २०-२२ आमदार गेलो होतो. तुम्ही त्या आमदारांना परत बोलवा असं सांगितले. परंतु तुम्हाला जायचं तर जा असं आम्हाला म्हटलं. आपल्यामधून १ माणूस फुटत असला तर मला रात्रभर झोप लागत नाही. आमचा कार्यकर्ता निघून गेला तर आम्हाला वाईट वाटतं. त्याला थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे ४० आमदार गेले तरी त्यांना जा असं म्हटलं गेले. त्यावेळी ४० आमदारांची किंमत त्यांना कळायला हवी होती. ५५ पैकी ४० आमदार बंड करतात तेव्हा त्यांचे म्हणणं ऐकलं पाहिजे होते. आता कुटुंबशाहीचं राजकारण राहिले नाही. सार्वजनिक विचार करणाऱ्याचं राजकारण सुरू आहे असंही त्यांनी सांगितले.
आम्ही जनतेनं मान्य केलेले राजे
आत्ताचा राजा राजाच्या पोटी जन्माला येत नाही. आत्ताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. १९९९ पासून मी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून येतोय. ९० साली पहिला आमदार देणारा आम्ही कार्यकर्ते आहोत. वानराची सेना आली असं म्हणून काँग्रेसवाले हिणवत होते. त्याच महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. मी दादा कोंडकेचा चित्रपट पाहणारा गावरान माणूस आहे. चुकून राजकारणात आलो. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने इथवर आलोय असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
पाण्यात राजकारण करत नाही
आम्ही ५०-५० हजार मतांनी निवडून आलोय, आम्ही सगळ्यांना पाणी देतो. आता सार्वजनिक विचार करणाऱ्या नेत्यांचे राजकारण झाले आहे. पाण्याचे खाते मिळाल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा १५ हजार कोटींचा बजेट पाणी पुरवठा विभागाचा झाला. राज्यातील ३४ हजार गावांना पाणी पोहचवणार आहे. सगळ्या पक्षातील लोकांना आम्ही पाणी देतो. पाण्यात राजकारण करत नाही असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"