पंचनाम्याच्या कामातून शिक्षकांना वगळणार - गृहराज्यमंत्री
By admin | Published: July 18, 2015 02:21 AM2015-07-18T02:21:42+5:302015-07-18T02:21:42+5:30
गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करताना सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नेमण्याच्या आदेशातून शिक्षकांना वगळण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.
मुंबई : गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करताना सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नेमण्याच्या आदेशातून शिक्षकांना वगळण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. या कामात पोलीस ठाण्यातून शिक्षकांनाही बोलावले जात असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला होता.
गुन्हा घडल्यानंतर अधिकारी पंचनामा करतात. त्यावेळी उपस्थित पंचाचे जबाब खटल्याच्या सुनावणीवेळी महत्त्वाचे ठरतात. पंच फितूर झाल्यास आरोपीची निर्दोष मुक्तता होण्याची भीती असते. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नेमण्याचा निर्णय सरकारने १२ मे रोजी घेतला होता. सरकारी कर्मचारी म्हणून निर्णयात उल्लेख केल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी सोयीने त्याचा अर्थ लावल्याचा आरोप शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केला. मोते यांनी सांगितले की, राज्यात शिक्षकांना वेठीस धरल्याची काही प्रकरणे निदर्शनास आली. त्यामुळे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन शिक्षकांना या कामातून वगळण्याची विनंती केली. ( प्रतिनिधी)