भाजपाचे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का?, मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 08:26 AM2022-04-12T08:26:16+5:302022-04-12T08:26:48+5:30

महाआघाडीच्या सत्ता स्थापनेपासूनच आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. त्यानंतरही सत्ताधारी पक्षांचा एकही आमदार फोडता आला नाही.

Minister Jayant Patil attacks bjp leaders over ed and cbi raids | भाजपाचे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का?, मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

भाजपाचे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का?, मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

googlenewsNext

उरण :

महाआघाडीच्या सत्ता स्थापनेपासूनच आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. त्यानंतरही सत्ताधारी पक्षांचा एकही आमदार फोडता आला नाही. आमदार फोडण्यात सपशेल अपयशी ठरल्याने केंद्र सरकारच्या सत्तेचा वापर करून राज्यातील फक्त महाआघाडीचे मंत्री, खासदार, आमदार, नेते, नेत्यांवर ईडी, आयकर खात्याच्या धाडी, जप्तीच्या कारवाईला सुरुवात केली. महाराष्ट्रातील भाजपचे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उरण येथील परिवार संवाद कार्यक्रमात विचारला. 

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात सोमवारी उरण तालुक्यापासून झाली. उरण येथील यूईएस शाळेच्या सभागृहात झालेल्या संवाद यात्रेस  खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे, अंकित साखरे, सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते.

या संवाद यात्रेप्रसंगी मार्गदर्शन करताना पाटील यांनी भाजपवर टीका केली. महाआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सत्तांतर करण्यासाठी भाजपचे सर्वच प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्यांनी एसटी कामगारांना हाताशी धरून थेट शरद पवारांच्या घरावर हल्ला केला आहे. यामागे मोठे षडयंत्र असून, याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी खोलात जाऊन तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

पवारांनी विविध समस्यांवर नेहमीच पुढाकार घेऊन केंद्रातही मोडण्याचे नव्हे तर जोडण्याचेच काम केले आहे. रशिया-युक्रेनमधील सुरू असलेल्या युध्दाच्या अगोदरपासूनच देशात महागाईचा भडका उडाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काय उत्तर आहे, असा सवालही पाटील यांनी विचारला. प्रत्येक दिवस नव्या संधींचा असतो. त्यामुळे काम करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यालाही सत्तेत न मागताही नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करून पदाचा हव्यास करणाऱ्यांचे पाटील यांनी कान टोचले.

 ‘मी पुन्हा येईन’
मतदारांचे प्रश्न आणि  समस्यांसाठी पक्षाच्या बूथ कमिट्या मजबूत बनवा, त्याचा आढावा घेण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पनवेल येथे सोमवारी राष्ट्रवादी  संवाद यात्रेच्या वेळी केले. या यात्रेच्या निमित्ताने पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सभा झाली. पनवेलमध्ये राष्ट्रवादी पक्ष उभा करायचा आहे. समविचारी पक्षांना संघटित करून पनवेल शहर जिल्हा सक्षम करायचा आहे. पक्षाच्या बूथ कमिटीने भावनिक प्रश्न न हाताळता मतदारांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न कार्यकर्त्यांनी हाताळले पाहिजेत, ते सोडविण्याचा प्रयत्न केला, तर पक्षसंघटना निश्चितच मजबूत होईल, असेही पाटील म्हणाले. 

‘निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून कारवाई’
जि.प. सदस्य कुंदा ठाकूर, वैजनाथ ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर कोप्रोली येथे ४ कोटी ८२ लाख रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे. उरण नगरपरिषदेची सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याप्रसंगी चाकणकर, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: Minister Jayant Patil attacks bjp leaders over ed and cbi raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.