"प्रिय अण्णा, त्यावर बोलाल या आशेसह...", अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:37 PM2022-06-15T12:37:14+5:302022-06-15T12:37:40+5:30
Jitendra Awhad on Anna Hazare: भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे. त्यावरुन आता विरोधकांनी केंद्राला धारेवर धरले आहे.
मुंबई: आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अण्णा हजारेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
अण्णा हजारेंना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण शुभेच्छा देत आहेत. पण, गेल्यावर्षीही खोचक शब्दांत शुभेच्छा देणाऱ्या आव्हाड यांनी यंदाही अण्णांना तशाच शुभेच्य़ा दिल्या आहेत. गेल्यावेळी चीनच्या विषयात लक्ष घालावे म्हणून तर यावेळी लष्करातील कंत्राटी भरतीवर बोलावं, अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
प्रिय अण्णा.....
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 15, 2022
आपण लष्करातील माजी सैनिक आहात त्यामुळे भयंकर महागाई ,वाढती बेरोजगारी,सामाजिक तेढ ,ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल ह्याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा pic.twitter.com/Ith0Ua52LH
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात की, "प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत. त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा," अशा शुभेच्छा आव्हाडांनी दिल्या आहेत.
केंद्र सरकारची नवीन योजना
या शुभेच्छांमधून जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या भारतीय सैन्य दलातील नवीन भरती प्रक्रियेवर टीका केली आहे. केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. भारतीय सैन्यदलांत तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. या अग्निपथ योजनेत चार वर्षांची सेवा आणि त्यानंतर सेवानिवृत्ती मिळेल. यावरुन आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.