मंत्री लोणीकर यांच्या मेव्हण्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या
By admin | Published: December 6, 2015 02:04 AM2015-12-06T02:04:40+5:302015-12-06T02:04:40+5:30
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेव्हणे कैलास बालासाहेब खिस्ते (४५) यांनी नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून निवळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
बोरी (जि. परभणी) : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेव्हणे कैलास बालासाहेब खिस्ते (४५) यांनी नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून निवळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़
जिंतूर तालुक्यातील निवळी येथील कैलास खिस्ते यांच्याकडे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन होते. परभणी जिल्ह्यांत दोन वर्षांपासून दुष्काळाची स्थिती आहे़ त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. खिस्ते यांना १५ एकर जमीन आहे़ जमीन गहाण ठेवून शेतीसाठी कर्ज घेतले होते़ शुक्रवारी खिस्ते हे नेहमीप्रमाणे घराच्या माडीवर झोपण्यासाठी गेले. शनिवारी सकाळी बराच वेळ झाला तरीही ते झोपेतून न उठल्याने घरच्या मंडळींनी माडीवर जाऊन पाहिले असता, त्यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले.
सततच्या नापिकीला कंटाळून खिस्ते यांनी जीवन संपविल्याची माहिती त्यांचे भाऊ श्रीहरी खिस्ते यांनी बोरी पोलिसांना दिली़ त्यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
खिस्ते यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, चार मुली, भाऊ असा परिवार आहे़ खिस्ते यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी निवळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बबनराव लोणीकर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
चार शेतकऱ्यांची आत्महत्या
नापिकी आणि कर्जबाजारीमुळे परभणीत आणखी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथे भानुदास नागोराव कल्हारे व सेलू तालुक्यातील डासाळा येथील बापूराव लक्ष्मणराव बागल (४०) यांनी नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली़ रवळगाव येथील सुभाष काशीनाथ फुलपगारे (३५) यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शनिवारी गळफास घेतला. तर वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहागीर येथील शांतीराम गोदमले (३७) यांनीही गळफास घेऊन जीवन संपविले.