"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:54 AM2024-09-30T10:54:45+5:302024-09-30T11:14:32+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजकांना सबसिडीच्या भरवशावर राहू नका असा सल्ला दिला आहे.
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. राजकारण्यांसह अधिकाऱ्यांनाही ते फटकारताना दिसतात. आता नितीन गडकरी यांनी राजकीय पक्षांबाबत केलेल्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यापासून दूर राहिले पाहिजे. कारण सरकार म्हणजे विषकन्या असते, असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. यासोबत नितीन गडकरी यांनी उद्योजकांना सबसिडीच्या भरवशावर राहू नका असाही सल्ला दिला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित ‘Advantage Vidarbha’ या उद्योजकांसाठीच्या कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं आहे. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी विदर्भातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला. तसेच राजकीय पक्षांबाबतही गडकरींनी भाष्य केलं. सरकारच्या भरवशावर राहू नका. सरकार ही विषकन्या असते, असं नितीन गडकरींनी म्हटलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला.
"कोणत्याही पक्षाचे सरकार असो. सरकारला तुमच्यापासून दूर ठेवा. सरकार ही विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्याला बुडवते. त्यामुळे उद्योजकांनी यांच्या लफड्यात पडू नये. सबसिडी घ्यायची असेल तर घ्या. पण सबसिडी कधी मिळेल याचा काही भरवसा नाही. माझ्या मुलाने सांगितले की ४५० कोटी रुपये अनुदान मिळालं आहे. मुलाने विचारलं की अनुदान कधी मिळणार. त्याला म्हटलं देवाला प्रार्थना कर. कारण काही भरवसा नाही की अनुदान मिळणार की नाही," असं नितीन गडकरी म्हणाले.
"अनुदानाविषयी बोलताना नितीन गडकरी यांनी महायुती सरकारच्या महत्त्वांकाशी लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार पडत असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना नितीन गडकरी यांनीही याबाबत भाष्य केलं. सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यामुळे त्यांनाही अनुदानाचे पैसे त्या योजनेसाठी द्यावे लागत आहेत. यामुळे अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही," असेही गडकरी म्हणाले.
विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत, पण अपेक्षित यश मिळत नसल्याची खंतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. विदर्भात ५०० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास कोणीही तयार नाही, असं नितीन गडकरींनी म्हटलं.