पंकजा मुंडेंचा केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यापासून दुरावा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 04:12 PM2019-09-09T16:12:54+5:302019-09-09T16:13:24+5:30
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजनात पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने उपस्थित होते.
मुंबई - केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या मुंबईत आयोजित कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दांडी मारली. सलग दुसऱ्यांदा पकंजा यांनी स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला दांडी मारली आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री इराणी यांच्यापासून पंकजा दुरावा ठवून असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईत लैंगिक शोषणातील पीडितेंच्या मदतीसाठी 'वन स्टॉप सेंटर'चे उद्घाटन स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पार पडले. किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या सेंटरची सुरुवात झाली. परंतु यावेळी पंकजा मुंडे गैरहजर होत्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजनात पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने उपस्थित होते.
दरम्यान केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहण्याची पंकजा यांची ही दुसरी वेळ आहे. याआधी स्मृती इराणी यांनी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या विविध योजनाची समीक्षा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. महाराष्ट्राच्या महिला व बाल कल्याण मंत्री असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु, त्यावेळी पंकजा या बैठकीला हजर नव्हत्या. तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला आवर्जुन उपस्थित होते.