वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 12:31 PM2024-06-15T12:31:49+5:302024-06-15T12:33:02+5:30
Prataprao Jadhav : प्रतापराव जाधव यांच्या वजनाइतक्या वह्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटण्याच्या उद्देशाने काही कार्यकर्त्यांनी त्यांची वहीतुला करायचं ठरवलं होतं. प्रतापराव या कार्यक्रमाला पोहोचले, तेव्हा तराजू तयार होता. प्रतापरावांना बसण्यासाठी पारड्यात सतरंजी ठेवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवल्यानं 'शिंदेसेने'चे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचं राजकीय वजन चांगलंच वाढलं आहे. त्यांचं बुलढाण्यात होत असलेलं जंगी स्वागत पाहून त्याची प्रचिती येतेय. पण, अशाच एका स्वागत सोहळ्यात काहीसा विचित्र प्रकार घडला. 'वहीतुले'च्या एका कार्यक्रमात, प्रतापराव पारड्यात बसायला आणि त्या पारड्याची साखळी तुटायला एकच गाठ पडली आणि केंद्रीय मंत्री खाली पडल्यानं सगळेच खजिल झाले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वजनाइतक्या वह्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटण्याच्या उद्देशाने काही कार्यकर्त्यांनी त्यांची वहीतुला करायचं ठरवलं होतं. प्रतापराव या कार्यक्रमाला पोहोचले, तेव्हा तराजू तयार होता. एका पारड्यात वह्यांचा ढीग रचला होता. वजन समसमान करण्यासाठी आणखी वह्या हातात घेऊन कार्यकर्ते उभे होते. प्रतापरावांना बसण्यासाठी पारड्यात सतरंजी ठेवली होती. सगळी सज्जता पाहून प्रतापराव पारड्यात मांडी घालून बसले आणि पुढच्याच क्षणाला एक साखळी तुटली. आधाराला काहीच नसल्यानं ते खाली पडले. सुदैवानं त्यांनी कुठलीही दुखापत झाली नाही. कार्यकर्त्यांनी लगेच पुढे सरसावून त्यांना उभं केलं. साखळी पुन्हा जोडून तराजू तयार करण्यात आला आणि वहीतुला सुफळ संपूर्ण झाली.
दरम्यान, ९ जून रोजी राष्ट्रपती भवनातील भव्य सोहळ्यात प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि बुलढाण्यात जल्लोष झाला. आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचं राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) त्यांना देण्यात आलं आहे. या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव आपल्या मतदारसंघात परतलेत. विविध संस्था, संघटना आणि नेतेमंडळींकडून त्यांचा सत्कार होत आहे.
प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार मानले जातात. २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ या चारही निवडणुकांमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांनी बाजी मारली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचा २९ हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. या कामगिरीचं बक्षीस म्हणून केंद्रीय राज्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली आहे.