जयंत पाटलांचा भाजप प्रवेश होणार?; बावनकुळेंच्या बंगल्यावरील भेटीनंतर विखे पाटलांचा खुलासा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:19 IST2025-02-28T16:18:22+5:302025-02-28T16:19:01+5:30
जयंत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भेट झाली होती.

जयंत पाटलांचा भाजप प्रवेश होणार?; बावनकुळेंच्या बंगल्यावरील भेटीनंतर विखे पाटलांचा खुलासा, म्हणाले...
NCP Jayant Patil: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आगामी काळात पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात, अशा चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आलं आहे. त्यातच जयंत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भेट झाल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळालं. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विखे पाटील यांना प्रश्न विचारला असता जयंत पाटील योग्य निर्णय घेतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांची राधाकृष्ण विखे यांच्याशी भेट झाल्याबाबत पत्रकारांनी विचारला असता विखे पाटील म्हणाले की, "केवळ भेटीवरून राजकीय गणितांची शंका कोणी घेऊ नये. दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. जयंतराव सक्षम नेते आहेत. ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. त्यानुसार चांगला निर्णय ते घेतील, अशी अपेक्षा आहे," अशी भूमिका विखे यांनी मांडली आहे.
जयंत पाटलांनी स्पष्टीकरण देत काय म्हटलं होतं?
पक्षांतराच्या चर्चा रंगू लागल्यानंतर नुकतंच जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की, "राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा येथील ४,६,९ जमिनींचे प्रश्न, आष्टा अप्पर तहसील कार्यालय इमारत प्रश्न, चांदोली वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, जमिनीवरील शेऱ्यांचे प्रश्न, सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनाचे प्रश्न अशा विविध प्रश्नांचा समावेश होता. बावनकुळे यांनी संध्याकाळी ६ ची वेळ दिली होती. मात्र ते सुनावणीमध्ये असल्याने त्यांना यायला उशीर झाला. त्याच वेळी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले असल्याने तिथे उपस्थित होते," असा खुलासा जयंत पाटलांनी केला आहे.